तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये मंगळवारी अजब प्रकार पाहायला मिळाला. चेपॉक सुपर जाईल्स आणि सालेम स्पार्टन्स यांच्यातल्या सामन्यात गोलंदाज अभिषेक तन्वरला २०वे षटक पूर्ण करण्यासाठी तब्बल ११ वेळा चेंडू फेकावा लागला. त्याने शेवटच्या षटकात २६ धावा दिल्या आणि त्यापैकी १८ धावा या शेवटच्या चेंडूवर आल्या.
सालेम स्पार्टन्सच्या गोलंदाजाची चेपॉक सुपर जाईल्सच्या संजय यादवने धुलाई केली. त्याने १२ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ३१ धावांची वादळी खेळी केली आणि संघाला ५ बाद २१७ धावांपर्यंत पोहोचवले. त्याने १ चेंडूंत १८ धावा केल्या आणि त्यात सलग ३ नो बॉलचा आणि १ वाईड बॉलचा समावेश होता. चेपॉकच्या २१७ धावांचा पाठलाग करताना सालेमला ९ बाद १६५ धावा करता आल्या आणि चेपॉकने हा सामना ५२ धावांनी जिंकला.
चेपॉकच्या १९ षटकांत ५ बाद १९१ धावा होत्या आणि अभिषेक तन्वरकडे शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी दिली गेली. त्याने पहिल्या चार चेंडूंवर ६ धावा दिल्या होत्या, परंतु पुढे सर्व गणित बिघडलं. पाचवा चेंडू नो बॉल पडला, परंतु फ्री हिटवर त्याने १ धाव दिली. त्यानंतर पुढचा चेंडूही नो बॉल पडला अन् त्यावर संजयने षटकार खेचला. पुन्हा एक नो बॉलमुळे फ्री हिट मिळाला. संजयने त्यावर दोन धावा केल्या, परंतु अभिषेकने सलग तिसरा नो बॉल टाकला. त्यानंतर फ्री हिटचा चेंडू वाईड टाकला. त्यानंतर शेवटचा चेंडू षटकार खेचला.
अभिषेकने शेवटच्या चेंडूवर १८ धावा दिल्या. त्यापैकी ३ नो बॉल व १ वाईड होता, तर १४ धावा चोपल्या गेल्या. अभिषेकने पहिल्या तीन षटकांत १८ धावा देत १ विकेट घेतली होती, परंतु शेवटच्या षटकाने सर्व गणित बदललं. संजय यादव आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सकडून खेळला. त्याने आयपीएल २०२२ मध्ये मुंबईकडून एक मॅचही खेळली होती.