लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई ( Marathi News ): आगामी आयपीएल सत्रासाठी मुंबई इंडियन्सनेगुजरात टायटन्सकडूनहार्दिक पांड्याची केलेली खरेदी तुफान चर्चेत राहिली. त्यातच आता मुंबई इंडियन्सने यासाठी गुजरात टायटन्सला चक्क १०० कोटी रुपये दिल्याचा दावा एका वर्तमानपत्राने केला आणि एकच खळबळ माजली. विशेष म्हणजे सोशल मीडियावरही या वृत्ताची चर्चा राहिल्याने दिवसभर पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स आणि हार्दिक पांड्या चर्चेत राहिले.
मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला १५ कोटी रुपये देत हार्दिकला आपल्या ताफ्यात घेतल्याचे सुरुवातीला समोर आले होते. मात्र, या वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार हा व्यवहार खूप मोठ्या रकमेत झाला आहे. तब्बल १०० कोटी रुपये मोजून मुंबई इंडियन्सने हार्दिकला आपल्या संघात घेतल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, हा व्यवहार याहून अधिक रकमेचा झाल्याची शक्यता असून, दोन्ही फ्रेंचाइजीसह भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि आयपीएल बोर्डला याबाबत कल्पना आहे.
यासमोर आलेल्या वृत्तानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. हार्दिकसाठी इतकी भक्कम किंमत मोजून मुंबई इंडियन्सने चूक तर नाही केली ना? तसेच, जर खरंच या वृत्तामध्ये तथ्य आहे, तर मुंबईसाठी हा निर्णय नुकसानीचाही ठरू शकतो. कारण, हार्दिक कायम दुखापतींचा सामना करत असतो. अशा परिस्थितीत तो दीर्घकाळ खेळू शकत नाही.
दुसरीकडे, हार्दिकला मुंबई इंडियन्सची मालकी असलेल्या अंबानी परिवाराचा निकटवर्तीय मानले जाते. तसेच, कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये हार्दिकने स्वत:ला सिद्ध करताना गुजरात टायटन्सला पहिल्याच प्रयत्नात जेतेपदही पटकावून दिले होते. तसेच, टी-२० मध्येही त्याला भारताला भविष्यातील कर्णधार मानले जात आहे. त्यामुळेच संघात त्याचा समावेश झाल्यानंतर मुंबई इंडियन्सने आपल्या संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडून हार्दिककडे सोपविण्याचा निर्णय घेतला होता.