मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : कन्यारत्न प्राप्ती झाल्यानंतरच्या पहिल्याच सामन्यात हिटमॅन रोहित शर्माने खणखणीत शतक झळकावले. त्यावरून हा लेकीचा पायगुण अशी अनेकांनी प्रतिक्रिया दिली. दुसऱ्या सामन्यात मात्र मोठी खेळी करण्यात अपयश आले असले तरी त्याने संघाला दमदार सुरुवात करून दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत रोहितचाच बोलबाला आहे. मैदानावरील कामगिरीने तो सतत चर्चेत असतोच, परंतु आता त्याची हवा आहे ती त्यानं केलेल्या एका पोस्टमुळे.
सध्या सोशल मीडियावर #10YearChallenge या मोहिमेने चांगलाच जोर धरला आहे. सामान्य व्यक्तीपासून ते सेलिब्रेटी या मोहिमेत सहभागी झाले आहेत. फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम.. आदी विविध सोशल नेटवर्किंग साइटवर #10YearChallenge ची चर्चा आहे. प्रत्येकजण आपण दहा वर्षांपूर्वी कसे होतो आणि आता कसे आहोत, यासंदर्भातील फोटो शेअर करत आहेत.
याला क्रिकेटपटूही अपवाद नाहीत. पण रोहित शर्माने #10YearChallenge या मोहिमेंतर्गत समाज प्रबोधन करणारे ट्विट केले. मी कसा होतो आणि आता कसा आहे, हे सांगण्यापेक्षा आपला निसर्ग कसा सुंदर होता आणि आता कसा बकाल झाला आहे. याचे विदारक चित्र त्याने पोस्ट केले आणि नेटिझन्सची पुन्हा मनं जिंकली.