Maharashtra Government Team India Price Money: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला आणि टी२० विश्वचषकाची ट्रॉफी दुसऱ्यांदा मायदेशात आणण्याचा पराक्रम केला. २००७ नंतर तब्बल १७ वर्षांनी भारतीय संघाने ही किमया साधली. महेंद्रसिंग धोनीच्या नंतर रोहित शर्माने हा पराक्रम केला आणि संपूर्ण भारताला आनंद दिला. भारताच्या संघात मुंबईचे प्रतिनिधित्व करणारे चार खेळाडू होते. कर्णधार रोहित शर्मासह शिवम दुबे, सुर्यकुमार यादव आणि यशस्वी जैस्वाल यांनी विश्वविजेतेपदाची चव चाखली. त्यांच्या या दमदार कामगिरीसाठी महाराष्ट्र सरकारने त्यांचा विधानभवनात सत्कार केला. याशिवाय, भारतीय संघातील चार मुंबईकरांना प्रत्येकी १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. बीसीसीआयने देखील टीम इंडियाला १२५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केलेच होते. हा बक्षिसांचा वर्षाव अद्यापही सुरुच असून, आता महाराष्ट्र सरकारनेही यात भर घातली आहे.
टी२० वर्ल्ड कप जिंकून आणणाऱ्या टीम इंडियावर बक्षिसांचा पाऊस पडताना दिसत आहे. बीसीसीआयने टीम इंडियाला १२५ कोटी रुपयांच्या बक्षिसाची रक्कम घोषित केली आणि वानखेडे मैदानावर झालेल्या भव्यदिव्य कार्यक्रमात हा धनादेश सुपूर्द केला. त्यानंतर, आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आणखी मोठी घोषणा केली. एकनाथ शिंदे यांनी टीम इंडियाला राज्य सरकारकडून ११ कोटींचे बक्षिस देण्यात येणार असल्याचे सांगितले. विधानभवनाच्या सेंट्र्ल हॉलमध्ये मुंबईच्या रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल या चार खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली.
दरम्यान, भारतीय संघाने तब्बल १३ वर्षांनी वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली. भारतीय संघाने टी२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा रोमहर्षक पद्धतीने विजय मिळवला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाच्या खेळाडूंनी संयमी कामगिरी करत सात धावांनी विजय मिळवला आणि गुरुवारी टी२० विश्वचषकाची ट्रॉफी मायदेशी आणली. भारतीय संघाने गुरूवारी भारतात आल्यानंतर आधी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर मुंबईत येऊन चाहत्यांच्या गराड्यात जल्लोष साजरा केला. या कार्यक्रमानंतर रात्री वानखेडे मैदानावर टीम इंडियाचा विशेष सत्कार करण्यात आला.