Join us  

७७ जागांसाठी ११६६ खेळाडू मैदानात; IPL २०२४ साठी दुबईत १९ डिसेंबर रोजी लिलाव

प्रत्येक संघाच्या खिशात १०० कोटींची रक्कम असल्याने लिलाव रंगतदार होऊ शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2023 5:29 AM

Open in App

नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगसाठी (आयपीएल) खेळाडूंचा लिलाव १९ डिसेंबरला दुबईत पार पडेल. आयपीएलचा लिलाव भारताबाहेर होण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. तसेच यावेळी प्रत्येक फ्रँचायझीकडे गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच कोटींची अधिक रक्कम राहणार आहे. गेल्या लिलावात खेळाडूंच्या खरेदीसाठी प्रत्येक फ्रँचायझीला ९५ कोटी रुपयांची रक्कम आखून देण्यात आली होती. यावेळी हा आकडा १०० कोटींवर पोहचला आहे. याशिवाय शिल्लक असलेली रक्कमही फ्रँचायझी १९ डिसेंबरच्या लिलावात वापरू शकतात.

११६६ खेळाडूंनी केली नोंदणीआयपीएल २०२४ च्या लिलावासाठी तब्बल ११६६ खेळाडूंनी स्वत:चे नाव नोंदविले आहे. यातील ८३० भारतीय तर ३३६ विदेशी खेळाडू आहेत. महत्त्वाचे म्हणजे विदेशी खेळाडूंच्या यादीत इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरचे नाव नाही. तर दुसरीकडे मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, गेराल्ड कोएत्झी आणि राचिन रवींद्र हे मोठे खेळाडू लिलावात भाव खाऊन जाऊ शकतात. भारतीय अनुभवी खेळाडूंमध्ये शार्दूल ठाकूर, हर्षल पटेल, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट यांचा समावेश आहे. यापैकी काहींवर १० कोटींपेक्षा जास्त बोली लागण्याची शक्यता आहे.

२ कोटी बेस प्राइज असलेले खेळाडू : हर्षल पटेल, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, केदार जाधव, मुजीब उर रहमान, शॉन एबॉट, पॅट कमिन्स, जोश हेजलवुड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मिचेल स्टार्क, स्टीव्ह स्मिथ, मुस्तफिजुर रहमान, टॉम बँटन, हॅरी ब्रूक, बेन डकेट, जेमी ओवरटन, आदिल रशिद, डेविड विली, क्रिस वोक्स, लॉकी फर्ग्युसन, गेराल्ड कोएत्झी, रिले रोसू, रॉसी वान डर डुसेन, अँजेलो मैथ्यूज.

१.५ कोटी बेस प्राइज असलेले खेळाडू : मोहम्मद नबी, मॉईझेस हेनरिक्स, ख्रिस लिन, केन रिचर्ड्सन, डॅनियल सॅम्स, डॅनियल वोरल, टॉम करन, मर्चेंट डी लांगे, ख्रिस जॉर्डन, डेव्डिड मलान, टाइमल मिल्स, फिल सॉल्ट, कोरी अँडरसन, कॉलिन मुन्रो, जिमी नीशम, टिम साउदी, कॉलिन इंग्राम, वानिंदू हसरंगा, जेसन होल्डर, शेरफेन रुदरफोर्ड.

१ कोटी बेस प्राइज असलेले खेळाडू : ॲश्टन एगर, रिले मेरिडिथ, डार्सी शॉर्ट, ॲश्टन टर्नर, गस ॲटकिंसन, सॅम बिलिंग्स, माइकल ब्रेसवेल, मार्टिन गुप्तिल, काइल जेमीसन, ॲडम मिल्ने, डॅरिल मिशेल, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, अल्झारी जोसेफ, रोवमन पॉवेल, डेव्हिड वीजे.

आयपीएलमधील सर्व दहा संघांनी जास्तीत जास्त खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ७७ खेळाडूंसाठी बोली लागेल. यामध्ये ३० विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. सर्व संघांकडे मिळून २६२.९५ कोटींची रक्कम शिल्लक आहे. प्रत्येक संघाच्या खिशात १०० कोटींची रक्कम असल्याने लिलाव रंगतदार होऊ शकतो.

टॅग्स :आयपीएल लिलाव