T20 World Cup 2026 - अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे सुरू असलेला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप हा २०२६ मध्ये भारत-श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यामाने पार पडणाऱ्या वर्ल्ड कपच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. अमेरिकेत प्रथमच होत असलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका हे पहिल्याच फेरीत बाहेर फेकले गेले. गतविजेत्या इंग्लंडने शेवटच्या क्षणाला सुपर ८ साठीचा उंबरठा ओलांडला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेतील Super 8 ही फक्त या स्पर्धेत पुढील फेरीत प्रवेश करण्याची पायरी नाही, तर याचसोबत हे ८ संघ २०२६ मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार २०२६ साली होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १२ संघ पात्र ठरले आहेत.
२०२६च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद भारत व श्रीलंकेला मिळाले आहे आणि यजमान म्हणून हे दोन्ही संघ आधीच पात्र ठरले आहेत. सध्या सुरू असलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, बांगलादेश, इंग्लंड, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांनी सुपर ८ मधील एन्ट्रीसह २०२६ च्या स्पर्धेची पात्रता निश्चित केली आहे. पाकिस्तान, श्रीलंका, न्यूझीलंड आणि आयर्लंड या संघांना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये सुपर ८ मध्ये प्रवेश मिळवता आला नसला तरी ते दोन वर्षानंतर होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी पात्र ठरले आहेत.
पाकिस्तानसह या चारही संघांनी आयसीसी ट्वेंटी-२० क्रमवारीमुळे आगामी वर्ल्ड कप स्पर्धेतील आपली पात्रता निश्चित केली आहे. न्यूझीलंड सहाव्या क्रमांकावर आहे, तर पाकिस्तान ७ आणि आयर्लंड ११ व्या क्रमांकावर आहेत. श्रीलंकेने यजमान म्हणून आपले स्थान पक्के केले आहे.
पात्र ठरलेले संघ - भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, आयर्लंड, पाकिस्तान
उर्वरित ८ संघ कसे पात्र ठरणार? - युरोप क्वालिफायरमधून २ संघ, ईस्ट एशिया पॅसिफिक क्वालिफायर व अमेरिकन्स क्वालिफायरमधून प्रत्येकी १-१ संघ आणि एशिया क्वालिफायर व आफ्रिका क्वालिफायरमधून प्रत्येकी २-२ संघ वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणार आहेत.
Web Title: 12 teams qualified for T20 World Cup 2026 held in India-SriLanka, Pakistan also got a chance; But, how?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.