नवी दिल्ली : भारतीय संघातून मोठ्या कालावधीपासून बाहेर असलेल्या पृथ्वी शॉनेइंग्लंडच्या धरतीवर चमकदार कामगिरी केली आहे. आयपीएलच्या सोळाव्या हंगामात अयशस्वी ठरलेला पृथ्वी टीकाकारांच्या निशाण्यावर आला होता. अशातच त्याने पहिले द्विशतक अन् आता झंझावाती शतक ठोकून टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे. सध्या इंग्लंडच्या धरतीवर रॉयल लंडन वन डे कप खेळवला जात आहे. भारतीय खेळाडूने नॉर्थम्प्टनशायरकडून खेळताना डरहमविरूद्ध १२५ धावांची नाबाद शतकी खेळी केली.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेनंतर पृथ्वी शॉची वेस्ट इंडिज दौऱ्यावर निवड झाली नव्हती. मग भारतीय खेळाडूने आपला मोर्चा परदेशात काउंटी क्रिकेटकडे वळवला. इंग्लंड डोमेस्टिक वन-डे कप २०२३ मध्ये त्याने धमाकेदार फलंदाजी करताना द्विशतक झळकावले. पृथ्वी शॉने पुनरागमन करण्यासाठी काउंटी क्रिकेटला प्राधान्य दिले आणि नॉर्थम्प्टनशायरकडून पदार्पण केले.
पृथ्वी शॉचे झंझावाती 'शतक' रविवारी झालेल्या सामन्यात पृथ्वीने सात षटकार आणि १५ चौकारांच्या मदतीने ७६ चेंडूंत १२५ धावांची नाबाद खेळी केली. भारतीय खेळाडूच्या शतकी खेळीच्या जोरावर नॉर्थम्प्टनशायरने सहा गडी राखून मोठा विजय मिळवला. नाणेफेक जिंकून डरहमने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना डरहमच्या संघाने ४३.२ षटकांत सर्वबाद १९८ धावा केल्या. १९९ धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना नॉर्थम्प्टनशायरकडून पृथ्वीने चमक दाखवली अन् सामना एकतर्फी केली. पृथ्वीने सुरूवातीपासूनच आक्रमक खेळ करत झंझावाती शतक झळकावले आणि संघाला विजय मिळवून दिला. नॉर्थम्प्टनशायरच्या संघाने २५.४ षटकांत ४ बाद २०४ धावा करून विजय साकारला.
दरम्यान, अलीकडेच पृथ्वी शॉने २४४ धावा करून ऐतिहासिक कामगिरी केली होती. लक्षणीय बाब म्हणजे लिस्ट ए क्रिकेटमध्ये इंग्लंडमध्ये द्विशतक झळकावणारा पृथ्वी पहिला भारतीय ठरला आहे. यापूर्वी सौरव गांगुलीने १९९९साली टॉंटन येथे श्रीलंकेविरुद्ध १८३ धावा आणि कपिल देव यांनी १९८३ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद १७५ धावा केल्या होत्या.