-अनन्या भारद्वाज, मुक्त पत्रकारतसं पाहिलं तर ही गोष्ट वैभव सूर्यवंशीचीच आहे. पण त्याहून मोठी गोष्ट आहे संजीव सूर्यवंशींची. बिहारमधल्या समस्तीपूर शहराजवळ ताजपूर नावाचं एक खेडं आहे. तिथला संजीव पोट भरायला म्हणून मुंबईत आला. पोट भरायचं पण हातात कौशल्य नाही पण काही वर्षे त्यांनी मुंबईत काढली, पडेल ते काम केलं. हाॅटेलमध्ये बाऊन्सर झाला, अगदी शौचालयं धुण्याचंही काम केलं. मात्र, सुटी असेल त्यादिवशी तो मुंबईतल्या मैदानांवर क्रिकेट पहायचा. क्रिकेट त्याला प्रचंड आवडायचं. मॅच असेल तर कामात मन लागत नसे. पुढे लग्न झालं. मुलंही झाली. हा गावी परत गेला. तिथं शेती करू लागला. बिहारमध्ये क्रिकेटला तसा काही स्कोप नव्हता आणि मोठ्या मुलाला लहानपणी बॅटबॉलमध्ये रस नव्हता पण धाकटा पोरगा वैभव मात्र वयाच्या चौथ्या वर्षापासून बॅटबॉलच्याच नादी लागला.
संजीवच्या मनातलं क्रिकेटवेड पुन्हा जागं झालं. त्यानं घराच्या मागच्या बाजूलाच नेट लावलं आणि पोराच्या क्रिकेट खेळण्याची सोय करून टाकली. समस्तीपूरला जाऊन क्रिकेट अकॅडमी शोधली आणि लेकाला घेऊन समस्तीपूरच्या वाऱ्यांनी ट्रेनिंग सुरू झालं.
संजीव सूर्यवंशींकडे पैसा फार नव्हताच पण त्यांच्या मनातलं स्वप्न सांगत होतं की या पोरात टॅलेंट आहे, आपला पोरगा क्रिकेटपटू होऊ शकतो. म्हणता म्हणता ते लहानसं पोर क्रिकेट अकॅडमीत मोठ-मोठ्या पोरांना भारी पडू लागलं. चेंडू उचलून मारू लागलं. त्याच्या प्रशिक्षकांनाही वाटू लागलं की हे पोरगं वेगळ्याच तयारीचं आहे. स्थानिक स्पर्धांत त्याची गुणवत्ता सिद्ध होऊ लागली तशी बाप-लेकांना पैशांची कमतरता भासली नाही. स्थानिक क्रिकेट-स्पॉन्सर्स यांच्यामुळे जेमतेम १३ वर्षांचा होता होता वैभवची मालमत्ता दीड कोटींच्या घरात पोहोचली आहे.
यावर्षी म्हणजे ५ जानेवारी २०२४ मध्ये वैभवने रणजी स्पर्धेत पदार्पण केलं. ज्या शहरात वडिलांनी केवळ उन्हात बसून क्रिकेट खेळणारी मुलं पाहिली, त्याच शहराच्या मातब्बर संघाविरुद्ध त्यांच्या लेकाने पदार्पण केलं. पुढे अण्डर १९ संघांत निवड झाली आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध वैभवने फक्त ५८ चेंडूत १०४ धावा केल्या.
वैभव आता आयपीएल लिलावासाठी नोंदवला गेलेला सर्वांत लहान वयाचा खेळाडू ठरला आहे. त्याचं वय १३ पूर्ण की १४ यावर वाद आहेतच. पण तो आयपीएलची दावेदारी सांगतो आहे हे नक्की..बाकी पुढचं पुढे..