मुंबई - भारताचा ग्रँडमास्टर १४ वर्षीय प्रज्ञानंदने जर्मनीचा आंतरराष्ट्रीय मास्टर बुकेल्स विरुध्द निर्णायक अकराव्या साखळी फेरीत कोणताही धोका न पत्करता डाव बरोबरीत सोडविला आणि जागतिक युवा बुध्दिबळ स्पर्धेमधील खुल्या १८ वर्षांखालील गटात अपराजित राहून सर्वाधिक साखळी ९ गुणांसह अजिंक्यपद पटकाविले. भारताचा आंतरराष्ट्रीय मास्टर अर्जुन कल्याणने प्रथम मानांकित आर्मेनियाचा ग्रँड मास्टर शांत सर्गस्यानला बरोबरीत रोखून चेन्नईच्या प्रज्ञानंदचे निर्विवाद विजेतेपद सुकर केले.
भारताने या अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगिरी करत तब्बल सहा पदकांची कमाई केली.त्यामध्ये तीन रौप्यपदकांचा समावेश आहे. भारताला 16 वर्षाखालील मुलींच्या गटात पदक मिळाले नाही. अक्षयाला अनौशा महादीनकडून अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले. 14 वर्षाखालील मुलींच्या गटात दिव्या देशमुख व रक्षिता रवी यांनी भारताला दोन पदक मिळवून दिले. महिला आंतरराष्ट्रीय मास्टर असलेल्या दिव्याने विजय मिळवत रौप्यपदक मिळवले. रक्षिताने एरडेने मुंगुंझुलला पराभूत करत कांस्यपदक पटकावले. या गटात कझाकस्तानच्या मेरूएर्ट कमालीदेनोवाने सलग पाच विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले.