अटलांटा: टी-२० क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक झळकविण्याचा मान वेस्ट इंडिजचा फलंदाज रहकिम कॉर्नवालने पटकविला आहे. २९ वर्षांच्या रहकिमने बुधवारी रात्री अटलांटा खुल्या टी-२० लीगमध्ये अटलांटा फायरकडून ७७ चेंडूत १७ चौकार आणि २२ षटकारांची आतषबाजी करीत २०५ धावा ठोकल्या.
रहकिमने तीन वर्षांआधी भारताविरुद्ध विंडीज संघात पदार्पण केले होते. लठ्ठपणामुळे तो लक्षवेधी ठरला. त्यावेळी त्याचे वजन १४० किलो व उंची ६.६ फूट होती. रहकिमच्या बळावर अटलांटा फायरने सामना १७२ धावांनी जिंकला. अटलांटाने २० षटकात १ बाद ३२६ धावा केल्या. स्टीव्हन टेलरने १८ चेंडूत ५ षटकार व ५ चौकारांसह ५३ धावा केल्या. समी असलमने २९ चेंडूत ५३ धावा केल्या. यानंतर स्क्वेअर ड्राईव्ह संघाने २० षटकात ८ बाद १५४ धावाच केल्या.
रहकिमने अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकून द्विशतक गाठले. याआधी त्याने ४३ चेंडूत शतक ठोकले होते. रहकिम वेस्ट इंडिजकडून केवळ एक कसोटी सामना खेळला आहे. टी-२० तो स्थानिक लीग खेळतो. तो म्हणाला,‘ मी हिटिंगचा सराव करीत नाही. नैसर्गिकदृष्ट्या ते गुण माझ्या फलंदाजीत आहेत. मैदानावर चौफेर फटकेबाजी करू शकतो.’ रहकिमने ६६ टी-२० सामन्यात आतापर्यंत १४७.४९ च्या सरासरीने ११४६ धावा केल्या आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: 140 kg rahkeem carnival double hundred blast in t20
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.