दुबई : संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरू असलेले आयपीएलचे १३ वे पर्व अखेरच्या टप्प्यात आहे. १० नोव्हेंबर रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. त्यापूर्वीच आयपीएलच्या चौदाव्या पर्वाची चर्चा सुरू झाली. पुढची आयपीएल एप्रिलमध्ये आयोजित करण्यात येईल, असे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा भारताऐवजी यूएईत आयपीएलचे सामने खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावर्षी आयपीएल स्पर्धाही उशिरा सुरू झाल्याने बीसीसीआयला चौदाव्या पर्वाच्या तयारीसाठी वेळ मिळाला नाही. परंतु या स्पर्धेच्या आयोजनाबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी हे सामने कुठे खेळवले जाणार आणि याव्यतिरिक्त भारतीय संघ कोणत्या संघांबरोबर सामने खेळणार याबाबत माहिती दिली. पुढील वर्षी एप्रिल आणि मे महिन्यादरम्यान आयपीएलच्या चौदाव्या पर्वाचे आयोजन केले जाईल, असे गांगुली म्हणाले.
पुढच्या आयपीएलचे आयोजन परदेशात नाही तर भारतातच केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आयपीएलच्या पुढील हंगामाबाबत करण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. रणजी सामने आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचेही आयोजन भारतात केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी आवश्यक सुरक्षेची काळजी घेतली जाईल. पुढील वर्षी इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून, सुरक्षेची संपूर्ण काळजी घेत हे सामने आयोजित करण्य़ात येणार असल्याचे गांगुली म्हणाले. दरम्यान, यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या तेराव्या पर्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यावरही त्यांनी भाष्य केले. ‘आयपीएलच्या आयोजनात अनेक समस्या आल्या, मात्र स्पर्धा चांगलीच रंगतदार ठरत आहे. आम्ही अन्य टी-२० लीगचाही सन्मान करतो. आयपीएलच्या यशामागे प्रेक्षकांचा मोठा वाटा आहे. त्यांच्याशिवाय हे अशक्य होते,’ असे गांगुली यांनी स्पष्ट केले.