नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध टी-२० लीग बिग बॅश लीग (BBL) धोक्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंनी यापूर्वी अनेकवेळा याबाबत भाष्य केले होते. बीबीएल लीगमध्ये खेळणारे ऑस्ट्रेलियन खेळाडू पैशांसाठी आशियातील टी-२० लीगकडे वळत असल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. असेच काहीसे झाल्याचे पाहायला मिळत आहे कारण ऑस्ट्रेलियातील खेळाडूंना बीबीएल मधून बाहेर काढून आपल्या लीगमध्ये खेळण्यासाठी जवळपास ३ कोटी ८५ लाख रूपयांची रक्कम देण्यात आली आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेट खूप चिंतेत आहे.
जर हे खेळाडू पैशांसाठी आपल्या देशाची लीग सोडून जात असतील तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मोठे नुकसान होईल असे बोलले जात आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) आंतरराष्ट्रीय लीगने (IL T20) ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख १५ खेळाडूंना बीग बॅश लीगमधून बाहेर होण्यासाठी कोट्यवधींची ऑफर दिली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही लीगचे आयोजन एकाच वेळी होणार आहे. बीग बॅश लीग १३ डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान खेळवली जाईल, तर आयएल टी-२० चा पहिला हंगाम ६ जानेवारी ते १२ फेब्रुवारी दरम्यान पार पडेल. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना दोन्ही लीगमध्ये खेळणे शक्य नाही. त्यामुळेच यूएईच्या लीगने कांगारूच्या खेळाडूंना कोट्यवधींची ऑफर दिली आहे.
१५ खेळाडूंनी घेतली माघार'सिडनी मॉर्निंग हेराल्ड'ने दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियातील कमीत कमी १५ खेळाडू बीग बॅश लीग मधून माघार घेणार असून ते यूएईच्या लीगमध्ये खेळणार आहेत. यूएईच्या लीगमधून खेळण्यासाठी त्यांना ७ लाख ऑस्ट्रेलियन डॉलर देण्यात आले आहेत. विद्यमान केंद्रीय करारानुसार कोणत्याच ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला बीग बॅश लीगमध्ये खेळण्यासाठी मजबूर केले जाऊ शकत नाही. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू डेव्हिड वॉर्नर २०१४ मध्ये या लीगमध्ये खेळला नव्हता.
BBL मध्ये कमी मानधन बीबीएलने आतापर्यंत सर्वाधिक मानधन डार्सी शॉर्टला दिले आहे. डार्सीला २० लाख ३७ हजार यूएस डॉलर्स दिले होते. अर्थात बीबीएलने डार्सी शॉर्टला एकूण ३ कोटी ७० हजार एवढी रक्कम दिली. आयपीएलने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना दिलेल्या रकमेच्या तुलनेत ही रक्कम फारच कमी आहे. परंतु आयपीएलच्या फ्रँचायझींनी यूएई आणि दक्षिण आफ्रिकेतील टी-२० लीगमध्ये देखील गुंतवणूक केली आहे. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया समोर मोठा पेच निर्माण झाला आहे.