नवी दिल्ली : भारताच्या कसोटी संघातील प्रमुख गोलंदाज इशांत शर्माने इंग्लंड दौरा चांगलाच गाजवला. आक्रमक खेळ हा त्याचा यशाचा मंत्र आहे. मात्र, मैदानाबाहेर इशांत परस्परविरोधी आहे. इशांतने 2013च्या एका घटनेबाबत खुलासा केला आणि सांगितले की त्या प्रसंगानंतर तो 15 दिवस रडतच होता. मैदानावर आक्रमक असलेला हा खेळाडू इतका हळवा कसा झाला आणि त्याच्या आयुष्यात असे काय घडले होते?
इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी दैनिकाशी बोलताना इशांतने 2013सालच्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन डे सामन्याच्या त्या प्रसंगाबाबत सांगितले. भारत-ऑस्ट्रेलिया मालिका 1-1 अशी बरोबरीत होती आणि मोहाली येथे तिसरा वन डे सामना होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियासमोर 303 धावांचे लक्ष्य ठेवले होते. ऑस्ट्रेलियाला 18 चेंडूंत 44 धावांची आवश्यकता होती आणि भारत हा सामना जिंकेल असेच चित्र होते. मात्र, त्यानंतर जे घडले ते कोणालाही अपेक्षित नव्हते.
डावाच्या 48व्या षटकात इशांत गोलंदाजीला आला आणि त्याच्यासमोर अष्टपैलू जेम्स फॉल्कनर फलंदाजीला होता. इशांतकडून बऱ्याच अपेक्षा होत्या, परंतु त्या षटकात इशांतने 30 धावा दिल्या. त्याच षटकात फॉल्कनरने भारताला पराभूत केले. त्याने 29 चेंडूंत 64 धावांची वादळी खेळी केली. त्या सामन्यानंतर इशांतवर क्रिकेटप्रेमींची सडकून टीका केली आणि त्या घटनेने इशांतला मोठा धक्का दिला. इशांत म्हणाला,''मी माझ्या भावनांवर संयम ठेवू शकलो नाही. माझ्यामुळे भारतीय संघावर पराभवाची नामुष्की ओढावली होती. मी 15 दिवस रडत होतो.''पत्नी प्रतिमा सिंह आणि मित्र राजीव महाजन यांनी त्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी इशांतला मदत केली.