पूर्वांचल भारतातल्या आणखी एका गोलंदाजानं सर्वांचे लक्ष वेधले आहे. मेघालयाच्या मिरूट येथील 15 वर्षीय निर्देश बैसोयानं 16 वर्षांखालील विजय मर्चंट चषक स्पर्धेत नागालँडविरुद्ध एका डावात 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. आसाम व्हॅली स्कूल येथे हा सामना झाला. ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियॉनला आदर्श मानणाऱ्या निर्देशनं 21 षटकांत 51 धावा देत 10 विकेट्स घेतल्या. निर्देशच्या आधी पूर्वांचलच्या रेक्स सिंगनं एका डावात 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.
''दहा विकेट घेतल्याचा आनंद अविश्वसनीय आहे. चांगली गोलंदाजी करू शकेन असा विश्वास होता, परंतु दहा विकेट घेईल, असे स्वप्नातही वाटलं नव्हतं,'' असे निर्देश म्हणाला. त्यानं पुढे सांगितले की,''ही खेळपट्टी फिरकीला साथ देणारी होतीच, परंतु आमच्या क्षेत्ररक्षकांनी उत्तम कामगिरी केली. त्यांचे योगदान तितकेच महत्त्वाचे आहे.''
निर्देशच्या गोलंदाजीच्या जोरावर मेघालयानं नागालँडच्या संपूर्ण संघ 42 षटकांत 113 धावांत माघारी पाठवला. मेघालय संघाने प्रत्युत्तरात आतापर्यंत 46 षटकांत 4 बाद 109 धावा केल्या आहेत. त्यातही निर्देशनं फलंदाजीत 68 धावांचे योगदान दिले आहे.
11 धावांत 10 विकेट्स, मणिपूरचा गोलंदाज भारतीय संघातनवी दिल्ली : पूर्वांचल भारतातील मणिपूरमध्ये फुटबॉल, हॉकी, वेटलिफ्टिंग, अॅथलेटिक्स आदी खेळांना जितकी पसंती मिळते, तितकी क्रिकेटला मिळत नाही. त्यामुळेच या भागातून क्रिकेटपटू घडल्याचे ऐकिवात नाही. पण, येथेही क्रिकेटची क्रेझ निर्माण होत आहे. 2018च्या डिसेंबरमध्ये मणिपुरचा जलदगती गोलंदाज रेक्स राजकुमार सिंह पहिल्यांदा चर्चेत आला. जगभरात फार कमी गोलंदाजांना जमलेली अविश्वसनीय कामगिरी त्याने करून दाखवली होती. त्याने 11 धावा देत 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता आणि त्याच्या या कामगिरीची दखल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) घेणं भाग पडलं. बीसीसीआयने नुकत्याच जाहीर केलेल्या 19 वर्षांखालील भारतीय संघात रेक्सची निवड करण्यात आली आहे. भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळवणारा रेक्स हा मणिपूरचा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
कूच बिहार ट्रॉफीत मणिपूर संघाचे प्रतिनिधित्व करताना रेक्सने प्रतिस्पर्धी अरुणाचल प्रदेशचा संपूर्ण संघ तंबूत पाठवला होता. त्याने 9.5 षटकांत 11 धावा देताना दहा विकेट्स घेतल्या होत्या. या दहा विकेट्समध्ये त्याने पाच फलंदाजांना त्रिफळाचीत केले होते, तर तीन फलंदाज पायचीत झाले होते. दोन फलंदाज झेलबाद झाले होते. ही अविश्वसनीय कामगिरी करताना त्याला तीन हॅटट्रिक्स नोंदवण्याची संधी होती, परंतु त्याला अपयश आले. 18 वर्षीय रेक्सला या कामगिरीचे बक्षीस मिळाले. भारताचा महान फलंदाज राहुल द्रविड याच्या मार्गदर्शनाखाली त्याला 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.