नवी दिल्ली : मिताली राज हिने टी२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताच, संघात युवा खेळाडूचा समावेश करण्याचा मार्ग मोकळा झाला. द. आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या आगामी टी२० मालिकेसाठी १५ वर्षीय शेफाली वर्माला भारतीय संघात स्थान मिळाले.
हरियाणाच्या शेफालीची यंदाच्या मोसमात महिला टी२० चॅलेंज स्पर्धेत दमदार कामगिरी राहिली होती. या स्पर्धेत तिने नागालँडविरुद्ध ५६ चेंडूत १२८ धावांचा तडाखा दिला होता. त्याआधारे तिला संघात स्थान देण्यात आले. मिताली मात्र तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करेल. त्यानंतर पाच टी२० सामने खेळले जातील. या संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करेल. स्मृती मानधना उपकर्णधार राहील. निवड समितीने गुरुवारी बीसीसीआय मुख्यालयात बैठक घेत संघ निवडला. यावेळी मितालीही उपस्थित होती. हरमनप्रीत कौर आणि प्रशिक्षक डब्ल्यू व्ही रमण हे टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे जुळले.भारतीय महिला संघएकदिवसीय : मिताली राज (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (उपकर्र्णधार), पूनम रावत, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया (यष्टिरक्षक), झूलन गोस्वामी, शिखा पांडे, मानसी जोशी, एकता बिश्त, पूनम यादव, डी. हेमलता, राजेश्वरी गायकवाड आणि प्रिया पुनिया.टी२० : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया (यष्टिरक्षक), पूनम यादव, शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, राधा यादव, वेदा कृष्णमूर्ती, हरलीन देओल, अनुजा पाटील, शेफाली वर्मा आणि मानसी जोशी.