इंग्लंडविरुद्धच्या रांची कसोटीत भारताचा यष्टीरक्षक ध्रुव जुरेलने चमकदार कामगिरी केली. जुरेलच्या या खेळीचे सर्व स्तरावरुन कौतुक झाले. जुरलेने ४ थ्या कसोटीमधील पहिल्या डावात ९० धावा आणि दुसऱ्या डावात दडपणाखाली नाबाद ३९ धावा करून भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या कामगिरीसाठी त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला.
ध्रुव जुरेलची ही कामगिरी पाहून भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर खूप आनंदी झाले. त्यांनी या युवा यष्टीरक्षकाची तुलना भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीशी केली. मात्र, सुनिल गावसकर यांचे हे वक्तव्य सौरव गांगुली यांना पटले नाही. त्यांनी सुनिल गावसकर यांनी केलेल्या तुलनेवर प्रतिक्रिया दिली आहे. एमएस धोनी हा वेगळ्या लीगमधील खेळाडू आहे, असं सौरव गांगुली यांनी सांगितले.
सामन्यादरम्यान समालोचन करताना गावसकर म्हणाले होते की, नक्कीच जुरेलने चांगली फलंदाजी केली आहे, पण त्याने यष्टीरक्षकाची भूमिका देखील चोखपणे बजावली आहे. मला असं वाटतं की भारताला पुढील एमएस धोनी मिळाला आहे, असं गावसकर म्हणाले होते. मला माहिती आहे, दुसरा धोनी कधीही होऊ शकत नाही. मात्र धोनीची सुरुवात देखील अशीच होती. जुरेलही एक स्ट्रीट-स्मार्ट क्रिकेटर आहे, असं गावसकर म्हणाले.
सौरव गांगुली काय म्हणाला?
गावसकरांच्या या वक्तव्यावर सौरव गांगुलीने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने रेवस्पोर्ट्झला सांगितले की, "एमएस धोनी हा वेगळ्या लीगमधील खेळाडू आहे. जुरेलकडे प्रतिभा आहे, यात शंका नाही. पण एमएस धोनीला एमएस धोनी बनायला १५-२० वर्षे लागली. त्यामुळे त्याला (जुरेल) खेळू द्या. जुरेलने मला सर्वात जास्त प्रभावित केले ते म्हणजे त्याची क्षमता...फिरकीपटूंना खेळण्याची क्षमता...वेगवान गोलंदाजांविरुद्ध खेळण्याची क्षमता… दबावाखाली खेळण्याची त्याची क्षमता. त्याचा स्वभावही चांगला आहे, असं सौरव गांगुलीने सांगितले.