Hobart Hurricanes Vs Sydney Sixers : बिग बॅश लीगच्या ५३व्या सामन्यात एक मोठा चमत्कार पाहायला मिळाला. होबार्ट हरिकेन्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात खेळल्या जाणार्या सामन्यात एका चेंडूवर १६ धावा झाल्या. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणार्या सिडनी सिक्सर्सची सुरुवात चांगली झाली. दुसऱ्या षटकासाठी आलेल्या होबार्ट हरिकेन्सच्या जोएल पॅरिसने तिसऱ्या चेंडूवर १६ धावा घेतल्या. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या सिडनी सिक्सर्सला सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर पहिला धक्का बसला. जोश फिलिप ८ धावा करून झेलबाद झाला. नवव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर संघाला दुसरा धक्का बसला. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या स्मिथने ३३ चेंडूत ६६ धावा केल्या. याआधी त्याने दोन सामन्यांत बॅक टू बॅक सेंच्युरी केली होती.
त्याच्याशिवाय हेडन केरने २ धावा, डॅनियल ख्रिश्चनने ८ धावा, कर्टिस पॅटरसनने १८ धावा आणि बेन द्वारशुइसने ३० धावा केल्या. संघाने ७ बाद १८० धावा केल्या. प्रत्युत्तरात हरिकेन्सने १५ षटकांत ४ बाद ११२ धावा केल्या आहेत आणि त्यांना ३० चेंडूंत ६९ धावा हव्या आहेत. झॅक क्रॅवली ४२ धावांवर खेळतोय.
दुसऱ्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर जोएल पॅरिसने एकही धाव दिली नाही. यानंतर स्टीव्ह स्मिथने तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. हा चेंडू नो बॉल होता आणि संघाला ७ धावा मिळाल्या. पुढचा चेंडू जोएलने वाईड टाकला आणि तो चौकार गेला. संघाच्या खात्यात आणखी पाच धावा जमा झाल्या. पुढच्याच चेंडूवर स्मिथने चौकार ठोकला आणि अशा प्रकारे एका लीगल चेंडूवर १६ धावा झाल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"