क्रिकेट हे एक प्रकारे राष्ट्र कर्तव्यच आहे... आशिया खंडात तर क्रिकेट हा एखाद्या सणासारखाच साजरा केला जातो. त्यामुळे त्याच्याशी प्रत्येकाची भावनिक नाळ जोडलेली आहे. 1999च्या वर्ल्ड कप स्पर्धेत महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या वडीलांचे निधन झाले होते. त्यावेळी तेंडुलकर मायदेशी परतला आणि अंत्यसंस्कार करून पुन्हा राष्ट्र कर्तव्यासाठी वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यास परतला. त्याच्या या देश प्रेमाचे दाखले आजही दिले जातात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक प्रकार घडलेही. अफगाणिस्तानचा रशीद खान यानेही वडीलांच्या निधनानंतर क्रिकेट सामना खेळला होता. अशाच भावनिक पेचात 16 वर्षीय क्रिकेटपटू अडकला. आईचं निधन झाले असताना केवळ संघाला आपली गरज आहे म्हणून त्यानं संघासोबतच राहण्याचा धाडसी निर्णय घेतला. क्रिकेटवर्तुळात या गोलंदाजाचे कौतुक होत आहे.
पाकिस्तानचा 16 वर्षीय नसीम शाह असे या खेळाडूचे नाव आहे. त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 6 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 26 विकेट्स घेतल्या आहेत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची पाकिस्तान संघात निवड झाली आहे. सोमवारी त्याच्या आईचे निधन झाले. पण, त्यानं संघाविरुद्ध राहण्याचा निर्णय घेतला. आज त्यानं सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया A संघाविरुद्ध पहिले षटक टाकले.
पाकिस्तानीस संघाच्या पहिल्या डावातील 428 धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया A संघांचा पहिला डाव 122 धावांत गडगडला. इम्रान खाननं ( 5/32) ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी पाठवला. दुसऱ्या डावात पाकिस्ताननं 3 बाद 152 धावांत डाव घोषित केला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डावात 1 बाद 40 धावा केल्या आहेत. या सामन्यात नसीमनं 3 षटकांत 12 धावा दिल्या. नसीमनं स्थानिक स्पर्धेत 8 सामन्यांत 32 विकेट्स घेतल्या. त्यानंतर त्याची 16 वर्षांखालील आणि 19 वर्षांखालील राष्ट्रीय संघात निवड झाली.