नवी दिल्ली : सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. आजपासून या स्पर्धेतील सुपर-१२ ची फेरी गाठण्यासाठी सामने खेळवले जात आहेत. पहिल्या सामन्यात नामिबियाच्या संघाने श्रीलंकेला (NAM vs SL) पराभूत करून विजयी सलामी दिली. सध्या संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) आणि नेदरलॅंड यांच्यात सामना खेळवला जात आहे. यूएईच्या संघातील युवा फिरकीपटू अयान अफझल खान याने आजच्या सामन्यातून एक अनोखा विश्वविक्रम केला आहे. विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात कमी वयात विश्वचषक खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.
दरम्यान, टी-२० विश्वचषक खेळणारा अयान हा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. या स्पर्धेत त्याने १६ वर्षे ३३५ दिवसांच्या वयात पहिला सामना खेळला. लक्षणीय बाब म्हणजे तो १७ वर्षांखालील वयात टी-२० विश्वचषक खेळणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. खरं तर अयानने याबाबतीत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरचा विक्रम मोडला आहे. आमिरने २००९ च्या टी-२० विश्वचषकात १७ वर्षे ५५ दिवसांचे वय असताना पहिला सामना खेळला होता. तर अफगाणिस्तानचा राशिद खान या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून त्याचे वय १७ वर्षे १७० दिवस असताना त्याने पहिला सामना खेळला होता.
नेदरलॅंडची शानदार सुरूवात सध्या नेदरलॅंड आणि यूएई यांच्यात सामना सुरू आहे. यूएईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १११ धावा केल्या आहेत. आपला पहिला सामना खेळत असलेल्या अयान खानला या सामन्यात साजेशी खेळी करता आली नाही. त्याने ७ चेंडूत ५ धावा केल्या आणि बाद झाला. नेदरलॅंडच्या घातक गोलंदाजीसमोर यूएईचे फलंदाज गारद झाले. बास डी लीडे (३), फ्रेड क्लासेन (२), रूलोफ़ वैन डेर मेर्वे आणि टिम प्रिंगल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेऊन यूएईला केवळ १११ धावांवर रोखले.
टी-२० विश्वचषकात सुपर-१२ फेरी गाठण्यासाठी आठ संघांमध्ये सामने खेळवले जात आहे. हे आठ संघ दोन गटात आमनेसामने असतील. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर-१२ सामन्यांसाठी पात्र ठरतील. यामध्ये नामिबिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती आणि नेदरलँडचे संघ अ गटात खेळतील, तर ब गटात आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे संघ असतील.
पहिला राउंड अ गट - नामिबिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती आणि नेदरलँड.
ब गट - आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे.
सुपर-१२ फेरीगट १ - अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, अ गटातील विजेता आणि ब गटातील उपविजेता.
गट २ - बांगलादेश, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, अ गटातील उपविजेता आणि ब गटातील विजेता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"