नवी दिल्ली : इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका (ENG vs SA) यांच्यामध्ये १७ ऑगस्टपासून पहिली कसोटी खेळवली जाणार आहे. या सामन्यापूर्वी आयसीसीसाठी (ICC) नियम बनवणारी संस्था मेरीलेबर्न क्रिकेट क्लबने (MCC) आपल्या सर्वात महागड्या लॉर्ड्स डिबेंचर तिकिटाच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यामुळे जर कोणाला हा सामना पाहायचा असेल तर त्याला तब्बल १७ लाख रूपये मोजावे लागणार आहेत. तसेच हे तिकिट एक-दोन नव्हे तर तब्बल ४ हंगामासाठी चालणार असणार आहे. म्हणजेच एकदा तिकिट काढलेला व्यक्ती ४ हंगाम त्या तिकिटावर सामना पाहू शकतो असे सांगण्यात आले आहे.
द टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, मेरीलेबर्न क्रिकेट क्लबने लॉर्ड्स डिबेंचरच्या तिकिटांची किंमत दरवर्षी ३८,००० रुपयांनी वाढवण्याची योजना आखली आहे. याच नियमामुळे आगामी दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या लॉर्ड्स कसोटीपूर्वी या विशेष तिकिटाच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती.
तिकिटावरून संभ्रमाचे वातावरण तिकीट दरात वाढ करण्याबाबतही अनेक विरोधाभास आहेत, कारण लॉर्ड्स कसोटीत पहिल्या दिवसाचा सामना पाहणाऱ्या चाहत्यांसाठी अवघ्या १५ हजार रुपयांत तिकीट उपलब्ध असणार आहे. कारण इंग्लंड क्रिकेट बोर्डाला (ECB) अद्याप उर्वरित चार दिवसांचे तिकिटे विकता आलेली नाहीत. अशा परिस्थितीत एवढे महाग तिकिट कोण खरेदी करणार यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे २८ हजार लोकांची क्षमता असलेल्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर सामना पाहण्यासाठी तिकिटाची सरासरी किंमत सात हजार रूपये निश्चित करण्यात आली आहे.