Join us  

१७ वर्षीय मुंबईकर जेमिमाची भारतीय संघात निवड, दक्षिण आफ्रिका दौ-यासाठी संघात समावेश

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आगामी दक्षिण आफ्रिका एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या दौ-यासाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली असून, १७ वर्षांची मुंबईकर युवा फलंदाज जेमिमा रॉड्रिग्स हिची निवड झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 9:49 PM

Open in App

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आगामी दक्षिण आफ्रिका एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या दौ-यासाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली असून, १७ वर्षांची मुंबईकर युवा फलंदाज जेमिमा रॉड्रिग्स हिची निवड झाली आहे. गेल्या काही काळामध्ये देशांतर्गत सामन्यांमध्ये केलेल्या धडाकेबाज आणि सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ जेमिमाला मिळाले आहे. बुधवारी बीसीसीआयने मुंबईत १६ सदस्यांच्या महिला क्रिकेट संघाची घोषणा केली.या मालिकेचा आयसीसी महिला चॅम्पियनशिपमध्ये (२०१७-२०२०) समावेश करण्यात आला असून, ही मालिका १० फेब्रुवारीपर्यंत खेळविण्यात येईल. सध्या भारताचा पुरुष संघ दक्षिण आफ्रिका दौ-यावर असून महिलांचा आफ्रिका दौरा २ फेब्रुवारीपासून सुरू होईल. या दौ-यासाठी भारताच्या नेतृत्त्वाची धुरा अनुभवी मिताली राजकडे कायम ठेवण्यात आली असून उपकर्णधारपदाची जबाबदारी आक्रमक फलंदाज हरमनप्रीत कौरकडे सोपविण्यात आली आहे.या दौ-यामध्ये भारत - दक्षिण आफ्रिका दरम्यान ५ फेब्रुवारीपासून ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळविण्यात येणार आहे. परंतु, त्याआधी या दोन्ही संघामध्ये २ फेब्रुवारीला एक सराव सामनाही होईल. विशेष म्हणजे एकदिवसीय सामन्यांनंतर दोन्ही देशांमध्ये पाच सामन्यांची टी२० मालिकाही खेळविण्यात येणार असल्याची माहिती ह्यबीसीसीआयह्णकडून मिळाली.---------------------------एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक :२ फेब्रुवारी : सराव सामना (ब्लूमफाँटेन)५ फेब्रुवारी : पहिल सामना (किम्बर्ले)७ फेब्रुवारी : दुसरा सामना (किम्बर्ले)१० फेब्रुवारी : तिसरा सामना (पॉचेफस्ट्रम).....................................पूनमनेच दिली आनंदाची बातमी...भारतीय क्रिकेट संघात जेमिमाची निवड झाल्याचे कळाल्यानंतर आमच्या घरामध्ये सर्वांनाच आनंदाश्रू अनावर झाले. तिने घेतलेल्या कठोर मेहनतीचे फळ तिला मिळाले. जेमिमाची सिनिअर खेळाडू पूनम राऊत हिनेच आम्हाला जेमिमाच्या निवडीची बातमी सर्वप्रथम सांगितली, अशी प्रतिक्रिया जेमिमाचे वडिल आयवन रॉड्रिग्स यांनी लोकमतकडे दिली. आयवन यांनी पुढे म्हटले की, अनेक सामन्यांमध्ये जेमिमा आणि पूनम यांनी मुंबईसाठी सलामी दिली आहे. त्यामुळे दोघी एकमेकांचा खेळ चांगल्याप्रकारे ओळखून आहेत. पूनमसोबत असल्याने जेमिमाला कोणतीही अडचण येणार नाही. त्याचप्रमाणे, आतापर्यंत ज्या वरिष्ठ खेळाडूंविरुद्ध जेमिमा खेळली, आता त्यांच्याचबरोबर ती ड्रेसिंग रुम शेअर करणार, याचा जास्त आनंद आहे. जेमिमाला मिताली राज, हरमनप्रीत कौर, झूलन गोस्वामी, वेदा कृष्णमूर्ती यांसारख्या खेळाडूंकडून खूप शिकण्यास मिळेल, असेही आयवन यांनी लोकमतला सांगितले.....................................शानदार कामगिरीचे आव्हानगतवर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या महिलांनी अंतिम फेरीत धडक मारली होती. जेतेपद थोडक्यात हुकले असले, तरी त्यांनी आपल्या झुंजार खेळाने देशाचे लक्ष वेधले होते. त्यामुळेच आता दक्षिण आफ्रिकेतही विजयी कामगिरी करण्याचे महिला संघावर काहीसे दडपण असेल.................................भारतीय महिला संघ:मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), सुषमा वर्मा, एकता बिश्त, स्मृती मानधना, पूनम यादव, पूनम राऊत, राजेश्वरी गायकवाड, जेमिमा रॉड्रिग्स, झूलन गोस्वामी, दीप्ती शर्मा, शिखा पांडे, मोना मेश्राम, पूजा वस्त्रकार, वेदा कृष्णामूर्ती आणि तानिया भाटिया (यष्टीरक्षक).

टॅग्स :क्रिकेट