लंडन, दि. - तब्बल 17 वर्षाच्या तपानंतर वेस्ट इंडिजने इंग्लंडच्या मैदानात साहेबांना पाच विकेटनं पराभव करत पाणी पाजले आहे. हेडिंग्लेच्या मैदानात बलाढ्या इंग्लंडचा पराभव करत विडिंजने कसोटीमध्ये आपल्या आस्तित्वाची जाणिव करुन दिली. इंग्लंडने दिलेल्या 322 धावांचा पाठलाग करताना शाई होप आणि क्रेग ब्रेथवेटने झुंजार खेळी केली. शाई होपने नाबाद 120 धावांची शतकी खेळी केली, तर ब्रेथवेटने त्याला 92 धावा काढत चांगली साथ दिली. सध्या 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजने 1-1 अशी बरोबरी साधलेली आहे. शतकी खेळी करुन वेस्ट इंडिजला विजय मिळवून देणाऱ्या शाई होपला सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं.
किएरन पॉवेल (२३) आणि ब्रेथवेट यांनी ४६ धावांची सलामी दिल्यानंतर काइल होप भोपळाही न फोडता बाद झाल्याने विंडीजचा डाव २ बाद ५३ धावा असा गडगडला. यावेळी इंग्लंड पुनरागमन करणार अशी शक्यता होती. परंतु, ब्रेथवेट आणि शाइ होप यांनी १४४ धावांची भागीदारी करुन विंडीजला विजयी मार्गावर कायम ठेवले.
मोईन अलीने ब्रेथवेटला बाद करुन ही जोडी फोडली. ब्रेथवेटचे शतक अवघ्या ८ धावांनी हुकले. त्याने १८० चेंडूत १२ चौकारांसह आपली खेळी सजवली. मात्र, एका बाजूने शाई होपने १२६ चेंडूत ११ चौकारांसह नाबाद ७४ धावा करुन इंग्लंडचे मानसिक खच्चीकरण केले. स्टुअर्ट ब्रॉड आणि मोईन अली यांनी प्रत्येकी एक बळी घेत चांगला मारा केला.
नाणेफेक जिंकत इंग्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी केली, मात्र हा निर्णय त्यांच्यावर चांगलाच उलटला. पहिल्या डावात अवघ्या २५८ धावांवर इंग्लडचा संघ गारद झाला. याचा फायदा घेत वेस्ट इंडिजच्या संघाने पहिल्या डावात ४२७ धावांचा डोंगर उभा केला. मात्र दुसऱ्या डावात इंग्लंडने सामन्यात जोरदार पुनरागमन करत, वेस्ट इंडिजला विजयासाठी ३२२ धावांचं आव्हान दिलं.