Pakistan vs England Test Series 2022 । नवी दिल्ली : डिसेंबर महिन्यात पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका होणार आहे. इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानच्या 18 सदस्यीय संघाची घोषणा झाली आहे. संघात फिरकीपटू अबरार अहमद आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद अली यांना संधी मिळाली आहे. 24 वर्षीय अहमदने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 13 सामन्यांत 76 बळी घेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. याशिवाय मोहम्मद वसीम ज्युनियर आणि जाहिद महमूद यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
जुलैमध्ये झालेली पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील मालिका 1-1 अशी अनिर्णित राहिली होती. त्यावेळी हसन अली, फवाद आलम आणि यासिर शाह हे या मालिकेचा हिस्सा राहिले होते. मात्र ते आगामी मालिकेचा हिस्सा नसणार आहेत. वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीच्या गुडघ्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. खरं तर शाहिनला 3 आठवडे विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे.
सरफराज अहमदला मिळाली संधी पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना 1 डिसेंबरपासून रावळपिंडी येथे खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरी कसोटी 9 डिसेंबरपासून मुलतानमध्ये, तर तिसरी आणि शेवटची कसोटी 17 डिसेंबरपासून कराचीमध्ये खेळवली जाईल. खरं तर मोठ्या कालावधीनंतर संघाचा माजी कर्णधार सरफराज अहमदला संघात स्थान मिळाले आहे.
इंग्लंडविरूद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ -बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, अब्दुला शफिक, अबरार अहमद, अझहर अली, फहीम अशरफ, हारिस रौफ, इमाम उल हक, मोहम्मद अली, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, नौमान अली, सलमान अली आगा, सरफराज अहमद, सऊद शकील, शान मसूद आणि झाहिद महमूद.