PAK vs ENG 3rd Test : पहिल्या दोन कसोटीत सपाटून मार खाल्यानंतर तरी पाकिस्तानचा संघ घरच्या मैदानावर इभ्रत वाचवण्याचा प्रयत्न करेल, असे वाटले होते. पण, इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतही त्यांच्यावर पराभवाची वेळ ओढावली आहे. या कसोटीत इंग्लंडने पदार्पणाची संधी दिलेल्या १८ वर्षीय रेहान अहमदने ( Rehan Ahmed) पाकिस्तानचे बारा वाजवले. आता इंग्लंडला पाकिस्तानला त्यांच्याच घरी व्हाईट वॉश देण्यासाठी केवळ १६७ धावाच करायच्या आहेत.
पाकिस्तानने पहिल्या डावात कर्णधार बाबर आजम ( ७६) व आघा सलमान ( ५६) यांच्या अर्धशतकाच्या बळावर ३०४ धावा केल्या. जॅक लिचने चार, तर रेहानने दोन विकेट्स घेतल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडची अवस्थाही खराबच झाली होती. ऑली पोप ( ५१) व बेन फोक्स ( ६४) यांचे अर्धशतक आणि हॅरी ब्रूक ( १११) याच्या शतकाने इंग्लंडला सावरले अन् ३५४ धावा करून ५० धावांची आघाडी घेतली. अब्रार अहमद व नौमान अली यांनी प्रत्येकी चार विकेट्स घेतल्या.
अब्दुल्लाह शफिक ( २६) आणि शान मसूद ( २४) यांनी सावध सुरुवात केली खरी, परंतु त्यांना मोठी खेळी करण्यात पुन्हा अपयश आले. बाबर आजम ( ५४) व सौद शकिल ( ५३) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, रेहानने पाकिस्तानचा डाव गुंडाळला. १६४ धावांवर त्यांची चौथी विकेट पडली अन् पुढील ५२ धावांत संपूर्ण संघ तंबूत परतला. पाकिस्तानला दुसऱ्या डावात २१६ धावा करता आल्या. रेहानने ४८ धावांत ५ विकेट्स घेतल्या. जॅक लिचने तीन विकेट्स घेतल्या. पदार्पणात डावात पाच विकेट्स घेणारा तो युवा गोलंदाज ठरला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"