१३ जुलै, २००२. लॉर्ड्सचे ऐतिहासिक मैदान. याच दिवशी भारताने यजमान इंग्लंडला पराभूत करून नेटवेस्ट सिरीज जिंकली. टीम इंडिया वाटचालीचा हा महत्त्वाचा टप्पा होता. विजयाचे नायक दोन तरुण खेळाडू होते. युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ. १९ वर्षांखालील संघातून भारताच्या वरिष्ठ संघात येऊन त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले.
कैफने ८७ धावा करून भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. २००२ साली भारत आणि इंग्लंड यांच्यातील नेटवेस्ट मालिकेच्या अंतिम सामन्याची दृश्ये आजही क्रिकेट चाहत्यांच्या मनावर कोरली गेली आहेत. युवराजसिंग आणि मोहम्मद कैफची चमकदार सामना जिंकणारी कामगिरी आणि त्यानंतर लॉर्ड्सच्या मैदानावर ‘दादा’ने टी-शर्ट काढून फिरल्याचा प्रसंग क्रिकेट चाहते कधीच विसरणार नाहीत.
या सामन्याला १९ वर्षे झाली आहेत. गांगुलीने नुकतेच वयाच्या ४९ व्या वर्षात पदार्पण केले. लॉर्ड्सच्या मैदानात नेटवेस्ट सिरीजमध्ये इंग्लंडचा पराभव केल्यानंतर सौरवने गॅलरीत टी शर्ट काढून केलेले सेलिब्रेशन आजही अनेकांना आठवते.