Kirti Azad wife passes away: भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि TMC खासदार कीर्ती आझाद यांच्या पत्नी पूनम आझाद यांचे सोमवारी निधन झाले. स्वतः कीर्ती आझाद यांनी ही माहिती दिली आहे. कीर्ती आझाद यांनी त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर केली. त्यांच्या पार्थिवावर दुर्गापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कीर्ती आझाद कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली १९८३ विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचे सदस्य होते. सध्या ते राजकारणात सक्रिय असून दरभंगा लोकसभा मतदारसंघातून टीएमसी खासदार आहेत.
कीर्ती आझाद यांनी सोमवारी, २ सप्टेंबर रोजी दोन पोस्ट केल्या. पहिल्या पोस्टमध्ये त्यांनी पत्नीने हे जग सोडल्याची माहिती दिली. त्यांनी लिहिले होते, "माझी पत्नी पूनम आता या जगात नाही. रात्री १२:४० वाजता त्यांचे निधन झाले. श्रद्धांजलीबाबत तुम्हा सर्वांचे आभार." त्यानंतर त्यांनी काही वेळाने दुसरी पोस्ट केली आणि सांगितले की अंत्यसंस्कार कुठे केले जाणार आहेत? माजी क्रिकेटपटूने लिहिले की, संध्याकाळी ४ वाजता दामोदर व्हॅली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील.
पूनम आझादही राजकारणात होत्या सक्रीय
पूनम आझाद यांना दुर्गापूर खूप आवडायचे, असे किर्ती आझाद म्हणाले. पूनम आझाद यादेखील बराच काळ राजकारणात सक्रीय होत्या. सुरुवातीला त्या एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून कार्यरत होत्या. नंतर त्यांनी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवली. २०२० च्या निवडणुकीत काँग्रेसने त्यांना संगम विहार विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. पण त्यात त्यांना विजय मिळाला नाही. २०१६ मध्ये आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला होता आणि त्यापूर्वी त्या दिल्ली भाजपच्या प्रवक्त्या होत्या. मात्र, आम आदमी पार्टीसोबत त्यांचे फार काळ जुळले नाही, त्यामुळे त्यांनी काही काळातच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.