ind vs aus test | नागपूर: सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. गुरूवारपासून या मालिकेतील पहिला सामना नागपुरात खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची भारतीय गोलंदाजांनी कंबर मोडली. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 5 बळी घेतले. तर रविचंद्रन अश्विनला 3 बळी घेण्यात यश आले. सामन्याच्या पहिल्या दिवशी विराटच्या जबरा फॅनने सर्वांचे लक्ष वेधले.
भारतीय संघात मोठ्या कालावाधीनंतर पुनरागमन केलेल्या जडेजाने कांगारूच्या संघाला मोठे धक्के दिले. रवींद्र जडेजाने पहिल्या सामन्याच्या पहिल्याच डावात 22 षटकांत 47 धावा देऊन 5 बळी घेत भारतीय चाहत्यांची मने जिंकली आहेत. ज्यानंतर 'सर जडेजा' सोशल मीडियावर हिरो झाला आहे. पाहुण्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपल्या पहिल्या डावात 63.5 षटकांत 177 धावा केल्या. भारताकडून जडेजाने (5), अश्विनने (3) तर मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतले. पहिल्या दिवशी विराट कोहलीच्या एका चाहत्याने सर्वांचे लक्ष वेधले. "मी माझ्या पत्नीपेक्षा जास्त विराट कोहलीवर प्रेम करतो", अशा आशयाचे पोस्टर झळकावून या चाहत्याने किंग कोहलीप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या.
रोहित शर्माचे शानदार शतक भारतीय संघ पहिल्या दिवसाअखेर मजबूत स्थितीत होता. पहिल्या दिवसाअखेर 24 षटकांत यजमान भारताने 1 बाद 77 धावा केल्या होत्या. कर्णधार रोहित शर्मा (56) आणि रविचंद्रन अश्विन (०) नाबाद खेळपट्टीवर टिकून होते. तर लोकेश राहुल (20) धावा करून तंबूत परतला. त्याला टॉड मुर्फीने बाहेरचा रस्ता दाखवला. दुसऱ्या दिवशी देखील रोहितने शानदार खेळी करून शतक झळकावले. 74 षटकांपर्यंत भारताने 5 गडी गमावले असून कर्णधार रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा खेळपट्टीवर टिकून आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"