नवी दिल्ली : उत्तराखंडच्या दीपक धपोलाने रणजी करंडक स्पर्धेच्या प्लेट गटातील दोन सामन्यांत 21 विकेट घेतल्या. चारपैकी तीन डावांत त्याने पाचपेक्षा अधिक विकेट घेण्याचा पराक्रम केला. रणजी स्पर्धेत आतापर्यंतच्या लढतीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दीपक आघाडीवर आहे. विशेष बाब म्हणजे दीपक पहिल्यांदाच रणजी स्पर्धेत खेळत आहे. त्याच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर उत्तराखंडने दोन्ही सामन्यांत विजय मिळवत गटात सिक्किमसह संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याचे पहिले प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखालीच दीपक घडला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे जलदगती गोलंदाज दीपकचा खेळ बहरला. 9 वर्ष तो दिल्लीत सराव करत आहे आणि 2016-17च्या रणजी करंडक स्पर्धेत तो दिल्लीकडून पदार्पण करण्याच्या जवळपास आला होता, परंतु त्याला संधी मिळाली नाही. यंदाच्या सत्रात तो उत्तराखंडचे प्रतिनिधित्व करत आहे.
उत्तराखंडने पहिल्या सामन्यात बिहारला 10 विकेटने पराभूत केले. या सामन्यात दीपकने 9 विकेट घेतल्या. त्यानंतर मणिपुरविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात दीपकने 12 विकेट घेतल्या. त्यान सलग तीन डावांमध्या पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला. याआधी दीपकने विजय हजारे चषक स्पर्धेत आठ सामन्यांत 14 विकेट घेतल्या आहेत. दीपक दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेनला आदर्श मानतो. त्याच्या फिटनेसचा तो चाहता आहे. दिल्लीत सराव करताना दीपकला भारताचा गोलंदाज आशिष नेहराकडून अनेक टिप्स मिळाल्या.