इंडियन प्रीमिअर लीगच्या 13व्या पर्वानंतर पाकिस्तान सुपर लीगच्या प्ले ऑफ सामन्यांना सुरुवात झाली आहे. मुल्तान सुल्तान आणि कराची किंग्स यांच्यातील क्वालिफायर सामना सुपर ओव्हरमध्ये गेला आणि त्यात कराची किंग्सनं बाजी मारून शाहिद आफ्रिदीच्या संघाचे पॅकअप केलं. एलिमिनेटर 1 सामन्यात लाहोर कलंदर संघानं 5 विकेट्स राखून पेशावर झाल्मीवर विजय मिळवला. या हायस्कोरींग सामन्यात गमतीदार किस्सा घडला.
पेशावर झाल्मी संघानं 9 बाद 170 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना कलंदर संघाकडून चांगली सुरुवात झाली. पण, 12व्या षटकात मोहम्मद इमराननं पहिला चेंडू टाकल्यानंतर सामना अचानक थांबवण्यात आला आणि कलंदरचा फलंदाज मोहम्मद हाफीज अचानक ड्रेसिंग रुमच्या दिशेनं धावत सुटला. नेमकं काय घडलं हे तेव्हा कुणालाच कळले नाही.
या कालावधीत पेशावर संघाचे वहाब रियाज, इमाम उल हक आणि शोएब मलिक आपसात चर्चा करत होते. स्पाईक कॅमेरा त्यांच्याजवळ थांबवण्यात आला. तेव्हा समालोचक रमीझ राजा यांनी त्यांच्याशी गप्पा मारण्यास सुरूवात केली. याच चर्चेच इमामनं सामना थांबण्यामागचं कारण सांगितले. रमीझ राजा यांनी हाफिजला टाईम आऊट का देत नाही असे विचारले. तेव्हा इमामनं सांगितलं की मागील दोन षटकांपासून हाफिजला लघवीला जायचे होते आणि त्यामुळे तो गेला. इमामच्या या उत्तरानंतर सर्वच हसू लागले.