लंडन : व्हीव्ह रिचर्ड्स, गॅरी सोबर्स आणि फ्रँक वोरेल या वेस्ट इंडिज दिग्गजांमध्ये सेसील राईट हे नाव अपरिचित वाटेल. पण, आता हे नाव आता चर्चेत आहे आणि त्याला कारणही तसेच आहे. वेस्ट इंडिजच्या या गोलंदाजाने वयाच्या 85व्या वर्षी अखेर निवृत्ती जाहीर केली. जमैका संघाचे प्रतिनिधित्व करताना सेसिलने 1958 साली बार्बाडोसविरुद्ध खेळताना गॅरी सोबर्ससारख्या दिग्गजाविरुद्ध प्रथम श्रेणी सामना खेळला. 1959 साली सेसिल इंग्लंडमध्ये स्थायिक झाला. त्यानंतर तिथे त्यांनी क्रॉम्पटन क्लबकडून व्यावसायिक क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.
1970 आणि 1980च्या सुरुवातीला सेसिल याने रिचर्ड आणि जोएल गार्नर यांच्याविरुद्धही खेळला आहे. त्याने 60 वर्षांच्या कारकिर्दीत जवळपास 20 लाख सामने खेळले आणि 7000 विकेट्स घेतल्या. त्याने पाच हंगमात प्रत्येकी 538 विकेट्स घेतल्या. म्हणजे 27 बॉलमध्ये प्रत्येकी एक विकेट या हिशोबाने त्याने कामगिरी केली आहे.
सेसिल म्हणाला,'' मी प्रामाणिकपणे सांगतो की मी काहीही खातो, पण मद्याचं अतीसेवन करत नाही. वयाचं कधीच मी भांडवल केलं नाही, त्यामुळेच मी तंदुरूस्त आहे. मी इतकी वर्ष कसा खेळत राहिलो, याचे उत्तर माझ्याकडेही नाही. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी सतत व्यग्र ठेवणे गरजेचे आहे. मला टिव्ही पाहायला आवडत नाही.'' सेसिल 7 सप्टेंबरला अखेरचा सामना खेळणार आहे.