Highest Opening Partnership in T20: टी२० क्रिकेट म्हणले की चाहत्यांना स्फोटक फलंदाजी पाहायला मिळण्याची खात्री असते. दिल्ली प्रीमियर लीग अंतर्गत ईस्ट दिल्ली रायडर्स (EDR) आणि जुनी दिल्ली-6 (PD) यांच्यातील सामन्यात अशीच स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. रायडर्स संघाचे सलामीवीर अनुज रावत आणि सुजल सिंग यांनी शानदार फलंदाजी करत संघाला २६ धावांनी विजय मिळवून दिला. हा सामना गुरुवारी खेळला गेला. रायडर्स संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना एकही विकेट न गमावता २४१ धावा कुटल्या. टी२० क्रिकेटमध्ये या जोडीने खास इतिहास रचला.
२४ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज अनुज रावतने ६६ चेंडूत नाबाद १२१ धावांची शानदार खेळी केली. अनुजने ११ षटकार आणि ६ चौकार लगावले. त्याचा स्ट्राइक रेट १८३ इतका होता. दुसरीकडे, सुजल सिंगने ५७ चेंडूत १०८ धावा केल्या. त्याने ९ षटकार आणि ७ चौकार मारले. सुजलचा स्ट्राईक रेट १८९ इतका होता. या दोघांच्या जोडीने टी२० इतिहासात अप्रतिम विक्रम आपल्या नावे केला.
अनुज आणि सुजलच्या जोडीने रचला इतिहास
अनुज आणि सुजल जोडीने टी२० क्रिकेटमध्ये नाबाद २४१ धावा करत पहिल्या विकेटसाठी दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी केली. अशी कामगिरी करणारी ही पहिलीच भारतीय जोडी आहे. टी२० क्रिकेटमध्ये पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक २५८ धावांची नाबाद भागीदारी करण्याचा विक्रम आहे. हा विक्रम जपानच्या सलामीच्या जोडीच्या नावे आहे. १५ फेब्रुवारी २०२४ रोजी जपान आणि चीन यांच्यातील सामन्यात जपानचे सलामीवीर लचलान यामामोटो-लेक आणि कर्णधार केंडेल काडोवाकी-फ्लेमिंग यांनी मिळून नाबाद २५८ धावा केल्या होत्या.
सामन्यानंतर काय म्हणाले अनुज-सुजल? पाहा व्हिडीओ-