भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली २००७ मध्ये पहिला वहिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. भारताच्या ५ बाद १५७ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ १५२ धावांत तंबूत परतला होता. अखेरच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी ७ धावांची गरज असताना MS Dhoni ने चेंडू जोगिंदर शर्माच्या ( Joginder Sharma ) हातात सोपवला अन् पठ्ठ्याने चतुराईने मिसबाह उल हकची विकेट घेत भारताला अविश्वसनीय विजय मिळवून दिला. मिसबाहचा स्कूप मारण्याचा प्रयत्न फसला अन् फाईन लेगला उभ्या असलेल्या एस श्रीसंथने झेल टिपला. भारताने ५ धावांनी हा सामना जिंकून इतिहास घडविला.
या इतिहासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या जोगिंदर शर्माने आज क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या त्या फायनलनंतर जोगिंदर भारताकडून केव्हाच ट्वेंटी-२० सामना खेळला नाही. २४ जानेवार २००७ मध्ये तो भारताकडून शेवटची वन डे खेळला होता. त्याने ४ वन डे सामन्यांत ३५ धावा केल्या व १ विकेट घेतली. तर ४ ट्वेंटी-२०त ४ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. आज निवृत्ती जाहीर करताना त्याने बीसीसीआय व टीम इंडियाचे आभार मानले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"