Join us  

गौतम गंभीर अन् फलंदाजी खंबीर; दोन वर्ल्ड कप फायनलच्या हिरोचा क्रिकेटला अलविदा

भारताला दोन विश्वचषक मिळवून देण्यात गंभीरचा मोठा वाटा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 10:48 PM

Open in App

मुंबई: दोन विश्वचषक विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या गौतम गंभीरनं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. गंभीर बरेच दिवसांपासून भारतीय टीमच्या बाहेर होता. आता आगामी विश्वचषकासाठीचा भारतीय संघ जवळपास निवडण्यात आला आहे. त्यामुळे गंभीर विश्वचचषकही खेळू शकत नाही. त्यामुळे गंभीरने अखेर क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.गौतम गंभीरच्या निवृत्तीनंतर चाहते भावूक झाले. गंभीरनं निवृत्तीचा निर्णय जाहीर करताच ट्विटरवर #ThankYouGambhir हॅशटॅग ट्रेंड झाला. भारताला दोन विश्वविजेतेपदं मिळवून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. मात्र या दोन्ही वेळा त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला नाही. पहिल्यावहिल्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत गंभीरच्या बॅटचा तडखा पाकिस्तानी गोलंदाजांना बसला. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या त्या वर्ल्डकपमध्ये अंतिम फेरीत भारतासमोर पाकिस्तानचं आव्हान होतं. प्रथम फलंदाजी करताना भारताचे फलंदाज एका बाजूनं बाद होत होते. मात्र गंभीरनं खेळपट्टीवर नांगर टाकला. एक बाजू लावून धरत धावगती वाढवण्याचं शिवधनुष्य त्यानं अगदी लिलया पेललं. त्याच्या 75 धावांच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर भारतानं 157 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानचा संघ 152 धावा करु शकला आणि भारतानं अवघ्या 5 धावांनी हा सामना जिंकला.चार वर्षांनी वानखेडेवर गौतमनं श्रीलंकेच्या गोलंदाजांना हिसका दाखवला. विश्वचषक सामन्याच्या अंतिम सामन्यात भारतासमोर 275 धावांचं आव्हान होतं. फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सेहवागला या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. यानंतर दोन खणखणीत चौकार मारुन सचिन तेंडुलकर माघारी परतला. यानंतर गंभीरनं विराट कोहलीच्या मदतीनं संघाला सावरलं. कोहली बाद झाल्यावर धोनीसोबत गंभीरनं शतकी भागिदारी रचली. धोनीनं उत्तुंग षटकार ठोकत भारताला सामना जिंकवून दिला. मात्र या विजयाचा पाया गंभीरनं रचला होता. संघ अडचणीत सापडला असताना गंभीर अगदी खंबीरपणे मैदानात पाय रोवून उभा राहिला. त्यामुळेच नंतर धोनीला फटकेबाजी करणं सोपं गेलं. 2007 आणि 2011 च्या वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यांमध्ये गंभीरनं भारताकडून सर्वाधिक धावा केल्या. मात्र या दोन्ही सामन्यात त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला नाही. 

टॅग्स :गौतम गंभीरभारतभारतीय क्रिकेट संघश्रीलंकापाकिस्तानविश्वचषक ट्वेन्टी-२०