नवी दिल्ली : 2013च्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात एस श्रीसंतवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून ( बीसीसीआय) करण्यात आलेली निलंबनाची कारवाई सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच उठवली. या प्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार बीसीसीआयचे लोकपाल जस्टिस (निवृत्त) डी के जैन हे श्रीसंतच्या शिक्षेबाबत पुढील निर्णय घेणार आहेत. तीन महिन्यांच्या आत लोकपालांनी श्रीसंतच्या शिक्षेचा निर्णय घ्यावा, असेही सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत.
जस्टिस अशोक भूषण और केएल जोसेफ यांनी बीसीसीआयने दाखल केलेल्या याचिकेवर हा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने 15 मार्चला बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने श्रीसंतवर लावलेली आजीवन बंदी उठवली होती. काय आहे प्रकरण ?श्रीसंतला 2013 मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंगच्या आरोपवरून दिल्ली पोलिसांनी मुंबईतून अटक केली होती. त्यानंतर बीसीसीआयने श्रीसंतवर आजीवन बंदी घालण्याचा आणि 10 लाख रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला होता मात्र आजीवन बंदी घालण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे श्रीशांतने म्हटलं होतं.