गेल्या वर्षी भारतात झालेल्या वन डे वर्ल्डकप स्पर्धेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला तब्बल १.३९ अब्ज डॉलर्सचा फायदा झाल्याचा दावा आयसीसीने केला आहे. बुधवारी आयसीसीने एक अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये सर्वाधिक लाभ हा देशातील पर्यटन क्षेत्राला झाल्याचे म्हटले आहे.
आयसीसीसाठी नील्सनने आर्थिक प्रभावाचा अभ्यास केला. यामध्ये २०२३ मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर या काळात आयोजित केलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा वर्ल्डकप होता असले म्हटले आहे. आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योफ अल्लार्डिस यांनी दिलेल्या निवेदनात भारताला ११, 637 कोटी रुपयांचा आर्थिक फायदा झाल्याचे म्हटले आहे. आयसीसी पुरुष वर्ल्डकप स्पर्धेने आपली ताकद दाखविली आहे, असे म्हटले आहे.
या स्पर्धेतील सामने आयोजित झालेल्या शहरांना 861.4 दशलक्ष डॉलर्स एवढा महसूल मिळाला आहे. यामध्ये हॉटेलिंग, प्रवास, वाहतूक आणि अन्न, पेये यांचा समावेश आहे. भारतातील आणि परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने सामने पाहण्यासाठी आले होते, असा दावा आयसीसीने केला आहे.
२०२३ चा वर्ल्डकप हा 12 लाख 50 हजार एवढ्या विक्रमी प्रेक्षकांनी पाहिल्याचे आयसीसीने म्हटले आहे. यापैकी सुमारे 75 टक्के लोक प्रथमच ICC 50 षटकांचा सामना पाहण्यासाठी आले होते. आंतरराष्ट्रीय चाहत्यांपैकी 55 टक्के लोकांनी यापूर्वी नियमितपणे भारताला भेट दिली होती. तर १९ टक्के प्रेक्षक हे केवळ पहिल्यांदाच भारतात आले होते. या प्रेक्षकांनी सामने पाहण्यासोबतच तेथील पर्यटन स्थळांनाही भेटी दिल्या. तसेच हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील इतर संस्थांद्वारे 48,000 हून अधिक पूर्ण- आणि अर्धवेळ नोकऱ्या निर्माण झाल्याचा दावा या अहवालात झाला आहे.