2023 World Cup Super League standings : न्यूझीलंडने पहिल्या वन डे सामन्यात भारतीय संघावर दणदणीत विजयाची नोंद केली. ३०७ धावांचे लक्ष्य किवींनी ७ विकेट्स राखून सहज पार केले. कर्णधार केन विलियम्सन व टॉम लॅथम यांनी २२१ धावांची भागीदारी करताना टीम इंडियाच्या गोलंदाजांना हतबल केले. या विजायसोबतच न्यूझीलंडने २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या दिशेने मोठे पाऊल टाकले. क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीग तालिकेत ( Cricket World Cup Super League standings) न्यूझीलंडने झेप घेतली. सध्या ते १२० गुणांसह ऑस्ट्रेलियासह संयुक्त क्रमांकावर आहेत, परंतु किवींचा नेट रन रेट थोडा कमी आहे.
BCCI ने आणखी एक विकेट काढली! राहुल द्रविडने निवडलेल्या माणसाच्या करारात केली नाही वाढ
शिखर धवनकडून सुटलेला झेल, शार्दूल ठाकूरने एका षटकात दिलेल्या २५ धावा अन् गोलंदाजांकडे अनुभवाची असलेली कमतरता यामुळे भारतीय संघाला हार मानावी लागली. न्यूझीलंडने ४७.१ षटकांत ३ बाद ३०९ धावा करून विजय मिळवला. केन ९८ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ९४ धावांवर,तर लॅथम १०४ चेंडूंत १९ चौकार व ५ षटकारांसह १४५ धावांवर नाबाद राहिले.
तत्पूर्वी, शिखर धवन ( ७२) आणि शुबमन गिल ( ५०) या जोडीनं भारताला दमदार सुरुवात करून देताना १२४ धावांची भागीदारी केली. रिषभ पंत (१५) व सूर्यकुमार यादव ( ४) हे अपयशी ठरले. श्रेयस अय्यर ( ८०) व संजू सॅमसन ( ३६) यांनी ७७ चेंडूंत ९४ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. दुखापतीतून कमबॅक केलेल्या वॉशिंग्टन सुंदरने १६ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारासह नाबाद ३७ धावा केल्या. भारताने ७ बाद ३०६ धावा उभ्या केल्या.
काय आहे ICC Men's Cricket World Cup Super League?
- वर्ल्ड कप सुपर लीग ही नवीन वन डे सामन्यांची स्पर्धा आहे. जी दोन वर्ष खेळवली जातेय. प्रथमच असा प्रयोग आयसीसीकडून होत आहे आणि या लीगमधून २०२३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत कोणते संघ खेळतील हे ठरवले जातील. १३ संघांचा या लीगमध्ये सहभाग आहे आणि त्यात १२ पूर्ण सदस्यांचा व नेदरलँड्सचा समावेश आहे.
- या लीगमध्ये कोणता संघ कितव्या स्थानी राहतो, त्यावर त्यांचे वर्ल्ड कप २०२३ मध्ये थेट खेळणे ठरणार आहे. या लीगमधील अव्वल ७ संघ वर्ल्ड कप २०२३ साठी थेट पात्र ठरतील आणि तळातील ५ संघांमध्ये पुन्हा पात्रता स्पर्धा खेळवली जाईल. लीगमध्ये एक संघ अन्य ८ संघांविरुद्ध किमान तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार. चार होम व चार अवे अशा या मालिका असतील.
- प्रत्येक संघ २४ वन डे सामने खेळणार आणि प्रत्येक विजयाला १० गुण दिले जातात. टाय किंवा नो रिझल्टसाठी संघांना प्रत्येकी ५ गुण आणि पराभूत झाल्यास एकही गुण नाही. षटकांची गती संथ ठेवल्यास संघाला पेनल्टी म्हणून गुण कमी केले जातील.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"