आकाश नेवे : भारताने कसोटीत पदार्पण करणाऱ्या अफगाणिस्तानचा दोन दिवसातच पराभव करण्याचा पराक्रम केला. भारताकडून कसोटीच्या इतिहासात पहिल्यांदाच ही कामगिरी झाली असली तरी या आधी २० कसोटी सामने पहिल्या दोन दिवसातच संपले आहेत. दोन दिवसात संपलेला हा २१ वा कसोटी सामना होता. त्यातील सुरुवातीचे १६ सामने हे तीन दिवसीय कसोटी सामने होते. कसोटी सामने पाच दिवसांचे करण्यात आल्यानंतर फक्त ५ सामनेच दोन दिवसात संपले आहेत.
जागतिक क्रिकेटच्या इतिहासातील नववा कसोटी सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला. हा सामना ऑस्ट्रेलियाने दोन दिवसातच सात धावांनी जिंकला होता. या काळात कसोटी सामने हे तीन किंवा चार दिवसांचे होत असत. त्यातील चौथा दिवस हा साधारणत: राखीव होता.
१९४६ पर्यंत १६ सामने दोन दिवसातच आटोपले, तर उर्वरित पाच सामने हे २००० ते २०१८ या काळातील आहेत. १९३१ मध्ये ऑस्ट्रेलियाने वेस्टइंडिज्ला पराभूत केले होते. हा टाईमलेस सामना होता. २००० साली वेस्ट इंडिजच्या इंग्लंड आणि स्कॉटलंड दौऱ्यात नासिर हुसेनच्या संघाने वेस्ट इंडिजला दोन दिवसातच पराभूत केले होते. त्या सामन्यात पहिल्या डावात क्रेग व्हाईट याने पाच गडी, तर दुसºया सामन्यात अँडी कॅडिक याने पाच गडी बाद करण्याची कामगिरी केली होती.
इंग्लंडने दोन दिवसांत संपलेल्या कसोटीत ९ वेळा विजय मिळवला आहे, तर ऑस्ट्रेलियाने ८ वेळा विजय मिळवला. २००२ मध्ये ऑस्ट्रेलियाने पाच दिवसीय कसोटीत पाकिस्तानला दोन दिवसातच लोळवले होते, तर उर्वरित सात विजय तीन दिवसीय कसोटीत मिळवले आहेत. त्यातही इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाया या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघात सहा वेळा दोन दिवसातच सामने आटोपले आहेत. अर्थात या तीन दिवसीय कसोटी लढती होत्या. त्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन वेळा विजय मिळवला. पाच दिवसीय कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दोन वेळा झिम्बाब्वेला दोन दिवसातच मात दिली. तर न्यूझीलंडनेही २००५ मध्ये झिम्बाब्वेला पराभूत केले होते.