मुंबई:मुंबई आणि उत्तराखंड यांच्यात रणजी ट्रॉफीचा उपांत्यपूर्व सामना झाला. या सामन्यात अवघ्या 21 वर्षीय सुवेद पारकरने इतिहास रचला आहे. सुवेदने त्याच्या पदार्पणाच्याच सामन्यात द्विशतक झळकावत स्वतःचे प्रशिक्षक अमोल मजुमदार यांच्या 28 वर्षे जुन्या विक्रमाची बरोबरी केली.
उत्तराखंड विरुद्ध खेळल्या जात असलेल्या या सामन्यात सुवेद पारकरने(आतापर्यंत) 18 चौकार आणि 3 षटकार ठोकले. त्याने 400 चेंडूत द्विशतक झळकावले. रणजी ट्रॉफीमध्ये बाद फेरीत पदार्पण करताना द्विशतक झळकावणारा सुवेद पारकर हा दुसरा खेळाडू आहे. सुवेदच्या आधी रणजी क्रिकेटपटू अमोल मजुमदारने 1994 मध्ये हरियाणाविरुद्ध 260 धावा केल्या होत्या. आता 28 वर्षांनंतर अमोल मजुमदार मुंबई संघाचे प्रशिक्षक असताना सुवेद पारकर यांने मजुमदार यांच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.
प्रथम श्रेणी पदार्पणात सर्वोच्च स्कोअर:
- 341 साकिबुल गनी (2022)
- 267* अजय रोहेरा (2018)
- 260 अमोल मजुमदार (1994)
- 256* बहीर शाह (2017)
- 240 एरिक मार्क्स (1920)
प्रथम श्रेणी सामन्यातील पदार्पणातील सर्वोच्च धावसंख्येबद्दल बोलायचे झाले तर हा विक्रम साकिबुल गनीच्या नावावर आहे. गनीने एकाच सत्रात 341 धावा केल्या होत्या. तो बाद फेरीचा सामना नसला तरी सुवेद पारकरचे द्विशतक बाद फेरीतील आहे. सुवेद पारकरच्या या चमत्काराने क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मुंबईच्या सूर्यकुमार यादवनेही ट्विट करून सुवेदचे अभिनंदन केले. तर सोशल मीडियावर चाहतेही सुवेद पारकरच्या या खेळीचे कौतुक करत आहेत.