मुंबई इंडियन्सने शानदार विजय मिळवताना गतविजेत्या गुजरात टायटन्सचा २७ धावांनी धुव्वा उडवला. सूर्यकुमार यादवने झळकावलेले स्फोटक नाबाद शतक मुंबईच्या विजयात निर्णायक ठरले. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकांत बाद २१८ धावा केल्यानंतर गुजरातला २० षटकांत ८ बाद १९१ धावांवर रोखले.
गुजरातविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूने सर्वांचे लक्ष वेदले, त्याचं नाव आहे, विष्णू विनोद. तिलक वर्मा तंदुरुस्त नाहीत आणि त्यांच्या जागी मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये केरळचा यष्टीरक्षक विष्णू विनोदला संधी दिली. २१८९ दिवस म्हणजेच सुमारे ६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएलमध्ये विष्णू विनोद मैदानावर फलंदाजीसाठी उतरला. कॅमेरून ग्रीन आणि टीम डेव्हिडच्या आधी मुंबईने त्याला संधी दिली.
पहिल्या ६ चेंडूत ४ धावा केल्यानंतर त्याने अल्झारी जोसेफच्या उंच चेंडूवर षटकार ठोकला. पण सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते कव्हर दिशेने मारलेल्या षटकाराने. मोहम्मद शमीच्या चेंडूवर विष्णू विनोदने जोरदार फटका षटकार लगावला. विष्णू विनोदने मारलेला हा षटकार आयपीएल २०२३मधील 'सर्वोतकृष्ट शॉट' असल्याचे सांगण्यात येत आहे. समालोचकाचाही विष्णू विनोदच्या शॉटवर विश्वास बसत नव्हता.
२०१७मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण-
२०१७मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी पदार्पण केल्यानंतर, २९ वर्षीय विष्णू विनोद दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबादचा भाग होता. मात्र त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. यंदाच्या लिलावात मुंबई इंडियन्सने विष्णू विनोदला २० लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले. त्याला खरतंर ईशान किशनसाठी बॅकअप म्हणून खरेदी केले होते. मुंबई इंडियन्सकडून गुजरातविरुद्ध विष्णू विनोदने २० चेंडूत ३० धावा केल्या. त्याच्या खेळीत २ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. सूर्यकुमार यादवसोबत त्याने चौथ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली.
लिस्ट ए आणि टी-२० मध्ये चांगलं प्रदर्शन-
विष्णू विनोद हे भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये नवीन नाव नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये किंवा रणजी ट्रॉफीमध्ये त्याला कोणताही मोठा पराक्रम करता आलेला नाही. पण लिस्ट ए आणि टी-२० मध्ये त्याचा रेकॉर्ड मजबूत आहे. ५१ टी-ट्वेंटी सामन्यांमध्ये १३९चा स्ट्राइक रेट आणि ३३ची सरासरी. लिस्ट ए मध्ये, केरळच्या यष्टीरक्षक फलंदाजाने ९३च्या स्ट्राइक रेटने आणि ४०च्या सरासरीने धावा केल्या आहेत. यानंतरही त्याला बराच काळ आयपीएलमध्ये संधी मिळत नव्हती. १४ मे २०१७ रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विष्णू विनोदचा अंतिम इलेव्हनमध्ये समावेश केला होता. त्याच मोसमात त्याने आयपीएलमध्ये पदार्पणही केले.
Web Title: 2189 days of waiting, Mumbai Indians gave a chance and hit the best shot of IPL 2023, who is Vishnu Vinod?, lets know
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.