ICC Men's Cricket World Cup - नवीन उल हकने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात पोहोचताच निवृत्ती जाहीर केली. अफगाणिस्तानचा संघ काल भारतात पोहोचला आणि बुधवारी नवीनने सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा करून सर्वांना चकित केले. नवीनने वयाच्या २४ व्या वर्षी वन डे क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानच्या गोलंदाजाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपला निर्णय स्पष्ट केला. त्याने लिहिले की, देशासाठी खेळणे हा सन्मान आहे. मी वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत आहे आणि वर्ल्ड कप संपताच मी या फॉरमॅटला अलविदा करेन. अफगाणिस्तानसाठी ट्वेंटी-२० फॉरमॅट खेळत राहणार आहे.
नवीन म्हणाला की, ''निवृत्तीचा निर्णय घेणे त्याच्यासाठी सोपे नव्हते, पण आपली कारकीर्द प्रदीर्ध करण्यासाठी हा कठीण निर्णय घ्यावा लागला. अफगाणिस्तान क्रिकेटला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार.'' त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने २०१६ मध्ये वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि जानेवारी २०२१मध्ये शेवटचा वन डे सामना खेळला होता. त्याने अफगाणिस्तानसाठी ७ वन डे सामन्यात १४ बळी घेतले. मार्च २०२३ मध्ये तो अफगाणिस्तानसाठी शेवटचा ट्वेंटी-२० सामनाही खेळला होता. आशिया चषकासाठीही नवीनची संघात निवड झाली नव्हती.