डेहराडून : अफगाणिस्तान क्रिकेट संघाने शनिवारी विक्रमांची आतषबाजीच केली. आयर्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० सामन्यात अफगाणिस्तानने ३ बाद २७८ धावा कुटल्या. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ही कोणत्याही संघाने केलेली सर्वोत्तम खेळी ठरली. या विक्रमासह अफगाणिस्तानने इंडियन प्रीमिअर लीगमधील विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगळूररू संघाचे विक्रम मोडले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानच्या हझरतुल्ला झाझई आणि उस्मान घाणी यांनी आयर्लंडच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी २३६ धावा चोपल्या. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये हाही एक विक्रम ठरला. झाझई आणि घाणी या जोडीने विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडला.
झाझई आणि घाणी यांच्या फटकेबाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने ३ बाद २७८ धावांचा डोंगर उभा केला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वोत्तम खेळीचा विक्रम कोहलीच्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूच्या नावावर होता. त्यांनी २०१३ मध्ये पुणे वॉरियर्स इंडिया संघाविरुद्ध ५ बाद २६३ धावा केल्या होत्या. २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्ध ३ बाद २६३ धावा करून त्या विक्रमाची बरोबरी केली होती. शनिवारी अफगाणिस्तानने हा विक्रम स्वतःच्या नावावर केला.
झाझई आणि घाणी यांनी पहिल्या विकेटसाठी जोडलेल्या २३६ धावाही विक्रमी ठरल्या. या भागीदारीसह त्यांनी कोहली व डिव्हिलियर्स यांनी गुजरात लायन्सविरुद्ध केलेल्या २२९ धावांचा विक्रम मोडला. झाझईने ४२ चेंडूत शतक पूर्व करताना ट्वेंटी-२० क्रिकेटमधील तिसऱ्या जलद शतकाची नोंद केली. त्याने ६२ चेंडूत ११ चौकार व १६ षटकारांसह नाबाद १६२ धावा केल्या. घाणीने ४८ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकार खेचून ७३ धावा केल्या.