जयपूर - एकदिवसीय सामन्यामध्ये दोन्ही संघांना प्रत्येकी ५० षटके खेळण्याची संधी मिळते. मात्र सध्या सुरू असलेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेमध्ये असा एक एकदिवसीय सामना खेळला गेला जो जेमतेम २० षटकेच चालला. त्याचं कारण ठरलं प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचं लवकर बा होणं. जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या नागालँड विरुद्ध त्रिपुरा सामन्यामध्ये नागालँडच्या संघाने प्रथम फलंदाजी केली. मात्र त्रिपुराच्या भेदक माऱ्यासमोर त्यांचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला आणि त्यांचा संपूर्ण संघ ४८ धावांत गडगडला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या नागालँडचे फलंदाज १५ षटकेही फलंदाजी करू शकले नाहीत त्यांचा संपूर्ण संघ अवघ्या १४ षटकांत ४८ धावांत गारद झाला. नागालँडचे सहा फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत. तर केवळ एका फलंदाजाने दुहेरी आकडा गाठड सर्वाधिक १६ धावा केल्या. उर्वरित ४ फलंदाज तर एकेरी धावसंख्येत माघारी परतले.
प्रतिस्पर्धी त्रिपुराचा गोलंदाज मणिशंकर मुरासिंह याने धारदार गोलंदाजी केली. आणि ६ षटकांत २ निर्धाव षटकांसह १९ धावा देत ५ बळी टिपले. त्याशिवाय राणा दत्ता याने पाच षटकांमध्ये ९ धावा देऊन २ विकेट्स घेतले तर अजय सरकारने ३ षटकांत १३ धावा देऊन २ विकेट्स घेतल्या. या तीन गोलंदाजांनी मिळून ९ बळी टिपले. तर एक फलंदाज धावचीत झाला.
विजयासाठी मिळालेल्या ४९ धावांच्या आव्हानाचा त्रिपुराने अवध्या ६१ चेंडूंमध्ये पाठलाग केला. माफक लक्ष्य समोर असताना त्रिपुराला षटकामागे अवघ्या एका धावेची गरज होती. अखेर १०.१ षटकांमध्ये २३९ चेंडू आणि १० विकेट्स राखून त्रिपुराने विजय मिळवला. त्रिपुराचा हा स्पर्धेतील सलग चौथा विजय ठरला आहे.