नवी दिल्ली : आयपीएल २०२३ मधून पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी बीसीसीआय आणि टाटा समूहाने संयुक्तपणे पुढाकार घेतला आहे. आयपीएलच्या प्लेऑफमध्ये आणि फायनलच्या सामन्यात टाकलेल्या एका डॉट बॉलमागे पाचशे झाडे लावली जातील, हा उपक्रम राबवला जात आहे. बीसीसीआयने याची माहिती दिली असून TATA IPL च्या प्लेऑफ आणि फायनलमध्ये २९४ निर्धाव चेंडू टाकण्यात आले. त्यामुळे आता तब्बल १,४७,००० झाडे लावली जाणार आहेत.
बीसीसीआयच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामाचे मुख्य प्रायोजक टाटा कंपनी आहे. बीसीसीआय आणि टाटा कंपनीने एक कौतुकास्पद पाऊल उचलले आणि प्लेऑफच्या चार सामन्यात जितके डॉट चेंडू पडतील त्या प्रत्येक चेंडूसाठी ५०० झाडे लावण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या क्वालिफायरमध्ये एकूण ८४ डॉट चेंडू पडले होते. तेव्हा सामन्यावेळी प्रत्येक डॉट चेंडूवेळी झाडाचे इमोजी दिसत होते.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी या उपक्रमाबाबत माहिती दिली होती. "आम्ही आयपीएलमध्ये प्रत्येक डॉट बॉलमागे ५०० झाडे लावणार आहोत. टाटा ग्रुपसोबत आम्ही हे काम करणार असून याचा आम्हाला अभिमान आहे", असे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार आता बीसीसीआय तब्बल एक लाख सत्तेचाळीस हजार झाडे लावणार आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, क्वालिफायर १ च्या सामन्यात ८४ बॉल डॉट टाकण्यात आले. तर एलिमिनेटर सामन्यात ९६, क्वालिफायर २ मध्ये ६८ आणि फायनलच्या सामन्यात ४६ निर्धाव चेंडू टाकले गेले.