ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस ही काही नवीन गोष्ट नाही... त्यात फ्रँचायझी लीगमध्ये तर फलंदाजांचीच दादागिरी अनेकदा पाहायला मिळते. मनोरंजनाचा खेळ बनलेल्या फ्रँचायझी लीगमध्ये फलंदाजाकडून गोलंदाजांनी निर्दयी धुलाई झालेली अनेकदा पाहिली असेल. ट्वेंटी-२० ब्लास्ट क्रिकेटमध्येही मिडलसेक्सने २२ जूनला इतिहास रचला. संघाने सरेकडून दिलेले २५३ धावांचे लक्ष्य ४ चेंडू राखून पूर्ण केले आणि स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च लक्ष्य गाठले. तसेच ट्वेंटी-२० क्रिकेटमधील दुसऱ्या सर्वोच्च लक्ष्याचा पाठलाग केला.
प्रथम फलंदाजी करताना सॅम करन, सुनील नरिन यांसारख्या खेळाडूंचा भरणा असलेल्या सरे संघाने विल जॅक्सच्या ९६ धावांच्या खेळीच्या जोरावर ७ विकेट्सच्या मोबदल्यात २५२ धावा केल्या. जॅकने ही खेळी ४५ चेंडूत खेळली आणि त्यात ८ चौकार आणि ७ षटकार खेचले. एका षटकात सलग पाच षटकार त्याने मारले. कर्णधार स्टीफन एस्क्विनाझी (७३) आणि मॅक्स होल्डन (६८) यांच्या अर्धशतकांसह जो क्रॅकनेल ( ३६ ) आणि रायन हिगिन्स ( ४८) यांच्या झंझावाती खेळीमुळे मिडलसेक्सने सामना १९.२ षटकांत जिंकला.
सरे संघाने एकूण १६ षटकार खेचले, तर मिडलसेक्स संघाकडून फक्त ८ षटकार आले. कमी षटकार मारूनही मिडलसेक्सने बाजी मारली, कारण त्यांनी सर्वाधिक ३३ चौकार खेचले. ख्रिस जॉर्डनच्या नेतृत्वाखालील संघ केवळ १९ वेळा चौकार मारू शकला. या विजयापूर्वी मिडलसेक्स संघाने सलग १४ ट्वेंटी-२० सामने गमावले होते.