IND vs ENG 5th Test Match: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना ७ मार्चपासून धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघ मालिकेत आधीच ३-१ ने आघाडीवर आहे. भारतातील इतर मैदानांच्या तुलनेत धर्मशालाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल मानली जात असल्याने येथील खेळपट्टी वेगवान आणि उसळती आहे. अशा परिस्थितीत कुलदीप यादवला खेळवण्याबाबत टीम इंडिया संभ्रमात असल्याचं दिसत आहे.
धर्मशालाच्या मैदानात ३ आठवड्यांपूर्वी रणजी सामना खेळवला गेला. हा रणजी सामना दिल्ली आणि हिमाचल प्रदेश यांच्यात खेळला गेला होता. चार दिवसांत ३६ विकेट पडल्या, तर या सर्व ३६ विकेट्स वेगवान गोलंदाजांनी घेतल्या. या मैदानात रणजीचे ४ सामने खेळवले. यामध्ये वेगवान गोलंदाजांनी एकूण ८१४ षटके टाकली आहेत आणि २३.१७ च्या सरासरीने १२२ बळी घेतले आहेत. फिरकीपटूंनी १२२.२ षटके टाकली आणि ५८.४२ च्या सरासरीने फक्त सात बळी घेतले.
वेगवान गोलंदाजांना या सामन्यात झुकते माप मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे फिरकीपटू कुलदीप यादवला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी जसप्रीत बुमराह संघात दाखल आहे. असे झाल्यास रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे संघाचे प्रमुख फिरकीपटू असतील. बुमराहच्या पुनरागमनानंतर मोहम्मद सिराज आणि आकाश दीपही संघात राहतील.
धर्मशाळेची खेळपट्टी कशी असेल?
क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, धर्मशालाची खेळपट्टी वेगवान आणि उसळणारी असेल, वातावरण ढगाळ असल्यास चेंडू स्विंगही होण्यास मदत होईल. वेगवान गोलंदाज मोठा प्रभाव पाडू शकतात, परंतु फिरकीपटू देखील बाउन्सचा आनंद घेऊ शकतात. खेळपट्टीवर कमी गवत दिसत असले तरी आऊटफील्ड हिरवेगार आहे. रिव्हर्स स्विंग झाल्यास, होण्यास थोडा वेळ लागू शकतो.
धर्मशाला येथील ५व्या कसोटीसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी: २५-२९ जानेवारी, हैदराबाद (इंग्लंड २८ धावांनी विजयी)दुसरी कसोटी: २-६ फेब्रुवारी, विशाखापट्टणम (भारत १०६ धावांनी विजयी)तिसरी कसोटी: १५-१९ फेब्रुवारी, राजकोट (भारत ४३४ धावांनी विजयी)चौथी कसोटी: २३-२७ फेब्रुवारी, रांची (भारत ५ गडी राखून विजयी)5वी कसोटी: ७-११ मार्च, धर्मशाला