नवी दिल्ली: सध्या ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यामध्ये कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. मात्र, मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या एक दिवस आधीच श्रीलंकेच्या संघाला मोठा झटका बसला आहे. कारण संघातील तीन खेळाडू धनंजया डी सिल्वा, जेफरी वेंडरसे आणि असिथा फर्नांडो दुसऱ्या कसोटीपूर्वी कोरोना संक्रमित आढळले आहेत. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियामधील दुसरा कसोटी सामना शुक्रवारी ८ जुलै रोजी सुरू होईल.
मालिका ड्रॉ करण्याचे लंकेसमोर आव्हान
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने गुरूवारी याबाबत अधिकृत माहिती देताना म्हटले की, बुधवारी झालेल्या रॅपिड ॲंटिजन टेस्टमध्ये तीन खेळाडूंची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला पहिल्या कसोटीत धूळ चारली आणि दोन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. त्यामुळे आगामी दुसरा सामना श्रीलंकेसाठी आर किंवा पार असा असणार आहे. कारण दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका ड्रॉ करण्याचे आव्हान श्रीलंकेसमोर असेल.
मॅथ्यूज पुनरागमनासाठी सज्ज
पहिल्या सामन्यातही श्रीलंका संघातील प्रमुख फलंदाज ॲंजलो मॅथ्यूज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कोरोना संक्रमित आढळला होता, ज्यामुळे ओशादा फर्नांडोला संघात स्थान मिळाले होते. मात्र आता मॅथ्यूज कोरोनातून बरा झाला असून दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज आहे. कोणत्याही संघातील खेळाडू कोरोना संक्रमित आढळला की त्याला पाच दिवस आयसोलेशनमध्ये ठेवले जाते आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरूद्धची टी-२० मालिका २-१ ने जिंकली, तर यजमान श्रीलंकेच्या संघाने ३-२ ने एकदिवसीय मालिका जिंकून ट्रॉफीवर कब्जा केला. त्यामुळे दुसराही कसोटी सामना जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी कांगारूचा संघ मैदानात उतरेल.
Web Title: 3 players Sri Lanka corona positive before the second Test against Australia
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.