अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर
चौथ्या टी-२० त मैदानी पंचाच्या झेलबादच्या वादग्रस्त निर्णयामुळे सूर्यकुमारची पदार्पणातील शानदार खेळी झाकोळली गेली. धोकादायक जोफ्रा आर्चरला पहिल्या चेंडूवर षटकार खेचून त्याने सुरुवात केली होती. बाद होण्याआधी ३१ चेंडूत ५७ धावांची ही विजयी खेळी होती. खरे तर दुसऱ्या सामन्यात त्याला पदार्पणाची संधी मिळाली; पण फलंदाजी करता आली नव्हती. पुढच्या सामन्यात त्याला बाहेर बसविण्यात आले तेव्हा चर्चा झाली. अन्य प्रतिभावान खेळाडूप्रमाणे त्याचीही कारकीर्द मर्यादित होणार का, या चर्चेला क्रिकेट वर्तुळात ऊत आला होता.
सूर्याचे सुदैव असे की इशान किशन दुखपातीमुळे बाहेर बसताच कोहलीने त्याला संधी दिली, शिवाय तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला पाठवले. सूर्याने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवून संस्मरणीय अर्धशतक ठोकले. भारताच्या नवख्या खेळाडूंनी केलेली कामगिरी या मोसमात लक्षवेधी ठरली आहे. मोहम्मद सिराज असो की वॉशिंग्टन सुंदर यांनी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध गरजेनुसार योगदान दिले. इंग्लंडविरुद्ध टी-२०त इशान आणि यादव यांनी स्वत:चे पदार्पण धडाक्यात केले.
ज्या चार खेळाडूंची चर्चा सुरू आहे. त्यापैकी साईराज, वॉशिंग्टन आणि इशान हे युवा ब्रिगेडचे प्रतिनिधित्व करतात. भारताच्या प्रतिभाशाली क्रिकेट परंपरेला अधोरेखित करताना ३० वर्षांचा यादव ने पुढील अनेक वर्षे महत्त्वपूर्ण योगदान देण्याचे संकेत दिले आहेत.सूर्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात हवा होता. पण जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने सोने केले. थरारक खेळाच्या बळावर भारतीय संघातील पदार्पण यशस्वी करून दाखविले. मधल्या काळात मात्र कठोर मेहनत घेत संधीची प्रतीक्षा करताना तो निराश झाला नाही, हे देखील महत्त्वाचे मानले पाहिजे. महत्त्वाकांक्षा आणि संयमी वाटचाल हे त्याच्या वाटचालीतील तात्पर्य आहे. आयपीएलने प्रसिद्धी आणि पैसा दिला असेल तरी भारतीय संघातील समावेशासाठी तो नेहमी फिटनेस, कौशल्य तसेच मानसिक कणखरता उंचावित राहिला.
प्रथम श्रेणीतील दीर्घ अनुभवामुळे खेळाडू मुरब्बी होत जातो. निवडकर्तेही त्याला सतत तपासत असतात. यादव बाबत हेच घडले. चौथ्या टी-२० त धडाकेबाज खेळी केल्यांनतर त्याचा वन डे संघासाठी विचार झाला. अशावेळी तो कसोटीसाठी योग्य ठरू शकेल, अशी चर्चा होणे स्वाभाविक आहे. ते निवडकर्तेच ठरवतील. मी म्हटल्यानुसार तीन युवा खेळाडूंसारखाच या मोसमात यादवनेदेखील ठसा उमटविला आहे. यामुळे हे खेळाडू सर्व वयोगटातील खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत बनले. शिवाय स्वत:चे स्थान भक्कम मानणाऱ्या मातब्बर खेळाडूंसाठी ते धोक्याची घंटा ठरले आहेत.