नवी दिल्ली - ज्या फलंदाजाला दिल्लीच्या संघाने अंतिम ११ मध्ये संधी दिली नाही. जो फलंदाज एक रणजी सामना खेळण्यासाठी झगडत होता. त्याने सध्या भारताबाहेर आपल्या बॅटचा इंगा दाखवला आहे. हा फलंदाज आहे नुकताच भारत सोडून अमेरिकेत खेळण्याचा निर्णय घेणारा उन्मुक्त चंद. (Unmukt Chand) उन्मुक्त सध्या अमेरिकेतील मायनर क्रिकेट लीगमध्ये सिलिकॉन व्हॅली स्ट्रायकर्सकडून खेळत आहे. तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून, नुकताच त्याने आपल्या संघाला शिकागो ब्लास्टर्सविरुद्ध ९ विकेट्सनी विजय मिळवून दिला आहे.(304 runs with 10 sixes, 30 fours; Unmukt Chand's stormy batting playing in America)
या सामन्यात उन्मुक्तने तुफानी फलंदाजी करताना ६३ चेंडूत नाबाद ९० धावा कुटल्या आहेत. त्याने आपल्या डावात १० चौकार आणि ३ षटकार ठोकले. यादरम्यान, त्याचा स्टाईक रेट १४२ एवढा राहिला. उन्मुक्त चंदसोबत वेस्ट इंडिजचा फलंदाज नरसिंह देवनारायणनेसुद्धा जबरदस्त फलंदाजी केली. डाव्या हाताच्या या फलंदाजाने ३० चेंडूत नाबाद ५१ धावा फटकावल्या. तर श्रीलंकेच्या शेहान जयसूर्यानेसुद्धा २० धावांची खेळी केली.
उन्मुक्त चंदने मायनर लीगमध्ये आतापर्यंत ८ सामन्यांत ६०.८० च्या सरासरीने ३०४ धावा कुटल्या आहेत. यादरम्यान, त्याने १० षटकार आणि ३० चौकार ठोकले. यादरम्यान, त्याचा स्ट्राईक रेट ११३ पेक्षा अधिक राहिला आहे. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत तीन अर्धशतके ठोकली आहेत. त्यात त्याची सर्वोच्च नाबाद ९० एवढी राहिली.
उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारताने २०१२ मध्ये १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता. तसेच त्याने आयपीएलमध्ये दिल्ली आणि मुंबईच्या संघांचे प्रतिनिधित्वही केले होते. मात्र गेल्या काही काळापासून पुरेशी संधी मिळत नसल्याने त्याने अमेरिकेकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता.
Web Title: 304 runs with 10 sixes, 30 fours; Unmukt Chand's stormy batting playing in America
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.