4 IPL Franchise Team Released Their Captain : आयपीएल २०२५ च्या हंगामाआधी फ्रँचायझी संघांनी खेळाडूंना रिटेन करण्याचा डाव खेळला आहे. आयपीएलमध्ये सहभागी असणाऱ्या १० संघांपैकी ४ संघ असे आहेत, ज्यांनी कर्णधाराशिवाय अन्य खेळाडूंना रिटेन करण्याला पसंती दिलीये. यातील ३ खेळाडू हे भारतीय असून एका परदेशी खेळाडूचा समावेश आहे. यातील एक चेहरा तर गत हंगामात आपल्या कॅप्टन्सीत संघाला चॅम्पियन करणारा आहे. एक नजर टाकुयात त्या खेळाडूंवर जे गत हंगामात संघाचे नेतृत्व करताना दिसले अन् आगामी हंगामात ते मेगा लिलावात दिसतील अशा चेहऱ्यांवर
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)
कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं श्रेयस अय्यर ६ खेळाडूंना आपल्या ताफ्यात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. यात गत हंगामात संघाला चॅम्पियन करणाऱ्या कर्णधाराला मात्र जागा मिळाली नाही. मेगा लिलावात काही फ्रँचायझी कॅप्टन्सीच्या रुपात त्याच्यावर मोठा डाव खेळण्यासाठी उत्सुक असतील. यात दिल्ली कॅपिटल्सचा संघ आघाडीवर असेल.
लोकेश राहुल (KL Rahul)
लखनऊ सुपर जाएंट्सपासून लोकेश राहुल वेगळा झाला आहे. त्याला रिटेन करण्यात संघ उत्सुक होता. पण या क्रिकेटरनेच ऑफर नाकारून लिलावात उतरण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा रंगली होती. रिटेन खेळाडूंची यादी समोर आल्यानंतर लखनऊ संघातून कॅप्टन आउट झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता तो बाहेर पडल्यावर २१ कोटी रुपयांमध्ये रिटेन करण्यात आलेल्या कॅरेबियन स्टार निकोलस पूरन या संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतो. दुसऱ्या बाजूला लोकेश राहुलला लिलावात कोणता संघ आपल्या ताफ्यात घेण्यासाठी उत्सुक असणार तेही पाहण्याजोगे असेल.
रिषभ पंत (Rishabh Pant)
दिल्ली कॅपिटल्स आणि रिषभ पंत यांच्यातही काहीतरी बिनसल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने रिटेन केलेल्या ४ खेळाडूंच्या यादीत रिषभ पंतचा समावेश नाही. कॅप्टन्सीच्या मुद्यावरून रिषभ पंतनं संघाला टाटा बाय बाय केल्याची चर्चा आहे. आयपीएलच्या मेगा लिलावात चेन्नई सुपर किंग्स त्याला आपल्या ताफ्यात सामील करण्यासाठी डाव खेळणार असल्याची चर्चाही रंगत आहे.
फाफ ड्युप्लेसिस (Faf Du Plessis)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने स्टार क्रिकेटर विराट कोहलीसह फक्त ३ खेळाडूंना रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे. गत हंगामात संघाची कॅप्टन्सी करताना दिसलेल्या फाफ ड्युप्लेसिसला त्यांनी रिलीज केले आहे. आगामी हंगामात विराट कोहलीच्या खांद्यावर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा रंगताना दिसते.
Web Title: 4 IPL Franchise Team Released Their Captain KKR Shreyas Iyer DC Rishabh Pant LSG KL Rahul RCB Faf Du Plessis
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.