नवी दिल्ली : आयपीएल २०२३ चा हंगाम अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. आपल्या पदार्पणाच्या हंगामात एलिमिनेटरपर्यंत मजल मारणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सला यंदा देखील एलिमिनेटरपर्यंतच समाधान मानावे लागले. मुंबई इंडियन्सने लखनौला पराभूत करून बाहेरचा रस्ता दाखवला. खरं तर आयपीएलचा सोळावा हंगाम लखनौच्या संघासाठी चढ-उताराचा राहिला. संघाचा नियमित कर्णधार लोकेश राहुल दुखापतीमुळे निम्मा हंगाम खेळू शकला नाही. तरीदेखील कृणाल पांड्याच्या नेतृत्वात लखनौने प्लेऑफचा गड सर केला.
भारतीय संघाचा खेळाडू लोकेश राहुलवर अलीकडेच शस्त्रक्रिया पार पडली. क्रिकेटपासून दूर असलेला राहुल सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओने राहुलला देखील आपलंस केल्याचे दिसते. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, एक ४ वर्षीय चिमुकली तिचा आवडता क्रिकेटपटू म्हणून राहुलला पसंती देते.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओला रिट्विट करत राहुलने म्हटले, "हे खूप गोड आहे. मला हिच्या पत्त्यासह DM करा. या मुलीला मी माझी स्वाक्षरी केलेली जर्सी देताना मला आनंद होईल." भारतीय संघाचा खेळाडू लोकेश राहुल दुखापतीमुळे सध्या क्रिकेटपासून दूर आहे. आयपीएल २०२३ मध्ये झालेल्या दुखापतीमुळे त्याने चालू हंगामातून माघार घेतली. याशिवाय पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्य स्पर्धेच्या अंतिम सामन्याला देखील राहुल मुकणार आहे.
WTC फायनलसाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के.एस. भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.